जळगाव घरकुल प्रकरण : ‘साधी कैद व सश्रम कारावास’ वरुन कामकाज तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:23 PM2019-09-19T12:23:02+5:302019-09-19T12:23:30+5:30
सरकारपक्ष आज निवाडे सादर करणार
जळगाव/औरंगाबाद : धुळे विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात आरोपींना साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. साधी कैद अपवाद तर सश्रम कारावास नियम आहे, त्यामुळे सरकारपक्षाचे अपील दाखल करावे की नाही?, नेमका कायदा काय आहे? यावर उच्च न्यायालयाने सरकार पक्षाला उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे संदर्भ (निकालाचे न्यायनिवाडे) गुरुवारी सादर करण्याचे निर्देश दिले, तोपर्यंत ही सुनावणी तहकूब ठेवण्यात आली.
तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल प्रकरणात शिक्षा झालेल्या सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत सोनवणे व इतर आरोपींंच्या जामीन अर्जावर बुधवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होती. तर या आरोपींच्या शिक्षेत आणि दंडात वाढ करण्यात यावी असे अपील सरकार पक्षाने न्या.पी.व्ही. नलावडे आणि न्या.के.के. सोनवणे यांच्या द्वीपीठात दाखल केले होते. या अपिलावरच बुधवारी खंडपीठात कामकाज झाले. विशेष सरकारी वकील अमोल सावंत व अॅड.प्रवीण चव्हाण यांनी सरकारपक्षाची बाजू न्यायालयात मांडली असता त्यावर न्यायालयाने संदर्भ सादर करण्याचे निर्देश देवून कामकाज तहकूब केले. बचाव पक्षाचे अॅड. महेश देशमुख, अॅड. किशोर संत, अॅड.सत्यजित बोरा आदी हजर होते.