जळगाव घरकूल प्रकरण : दहा आरोपींवर वेगवेगळ्या वॉर्डात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:10 PM2019-09-03T12:10:33+5:302019-09-03T12:11:12+5:30
महिला जाणार आज उच्च न्यायालयात, ३८ जण कारागृहात
जळगाव/धुळे : जळगाव घरकुल प्रकरणात शिक्षा झालेल्या ४८ पैकी १० आरोपी हिरे वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात वेगवेगळ्या वॉर्डात उपचार घेत आहेत. तर सुरेशदादा जैन यांच्यासह ३८ आरोपी कारागृहात आहेत. दरम्यान, जामीन व निकालाच्याविरुध्द सर्व महिला आरोपी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर ४ वर्ष शिक्षा झालेले व नंतर सात वर्ष शिक्षा झालेले आरोपी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सदाशिव ढेकळे, शिवचरण ढंढोरे, विजय कोल्हे, दत्तू देवराम कोळी, लता भोईटे, अलका भोईटे, साधना कोगटा, मिना वाणी व सुधा काळे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रत्येक वॉर्डात आरोपींसाठी स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आलेला आहे़ सुरेशदादा जैन यांच्यासह ३८ जण कारागृहात आहेत.
जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी धुळे येथील विशेष न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांनी गुन्ह्यातील सर्व ४८ जणांना दोषी धरुन शनिवारी वेगवेगळी शिक्षा सुनावली. या सर्वांना धुळे जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले होते़ तत्पुर्वी या सर्वांची हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती़ त्यानंतर त्यांना कारागृहात पाठविण्यात आले़ तेथे १० जणांनी टप्प्या-टप्प्याने प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
देवकर व ढंडोरे वॉर्ड ३५ मध्ये दाखल
रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये शिवचरण ढंढोरे, गुलाबराव देवकर आणि सदाशिव ढेकळे यांच्यावर उपचार सुरु आहेत़ विजय कोल्हे यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना वॉर्ड क्रमांक १७ मध्ये ठेवण्यात अले होते़ त्यानंतर त्यांना आता ३५ नंबरच्या वॉर्डात दाखल करण्यात आले आहे़ त्यांनाही स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आलेला आहे़ दत्तू देवराम कोळी यांना तर न्यायालयाच्या आदेशानेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणच्या वॉर्ड क्रमांक १२ मध्ये त्यांना ठेवण्यात आले असून स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आलेला आहे़ त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ३३ मध्ये पाच महिलांवर उपचार सुरु आहेत़ त्यात लता भोईटे, अलका लढ्ढा, साधना कोगटा, मिना वाणी आणि सुधा काळे यांचा समावेश आहे़ या पाच महिला आरोपींसाठी स्वतंत्र बंदोबस्त देण्यात आला आहे़