Jalgaon: सोने ६६ हजारांच्या पुढे, ६६,१०० रुपयांवर पोहचले भाव, चांदीत ३०० रुपयांची घसरण
By विजय.सैतवाल | Published: March 20, 2024 11:03 PM2024-03-20T23:03:55+5:302024-03-20T23:04:09+5:30
Jalgaon Gold Price: ११ दिवसांपूर्वी ६६ हजार ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली आहे.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - ११ दिवसांपूर्वी ६६ हजार ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून भाववाढ सुरू झालेल्या सोन्याच्या भावाने याच महिन्यात ६५ हजारांचा पल्ला ओलांडला होता. त्यानंतर भाववाढ कायम राहत ९ मार्च रोजी ते ६६ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. चार दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर सोन्याचे भाव कमी होत जाऊन ६५ हजार ६०० रुपयांवर आले होते. त्यानंतर मात्र मंगळवार, १९ मार्च रोजी त्यात पुन्हा ४०० रुपयांची वाढ होऊन ते ६६ हजार रुपये प्रति तोळा झाले. बुधवार, १० मार्च रोजी १०० रुपयांची वाढ झाली. ही किरकोळ वाढ असली तरी सोने ६६ हजारांच्या पुढे गेले आहे.
चांदीच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहे. ९ मार्च रोजी सोने ६६ हजारांवर पोहचले असताना त्या दिवशी चांदी ७४ हजारांवर स्थिर होती. १५ मार्च रोजी ती ७६ हजारांवर पोहचली. त्यानंतर पुन्हा भाव कमी होत जाऊन १९ मार्च रोजी चांदी ७५ हजार रुपये प्रति किलोवर आली. बुधवार, २० मार्च रोजी पुन्हा ३०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली.