काढणी झालेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्कीटमुळे आग, हाता-तोंडाशी आलेला घास आगीने हिरावला
By विजय.सैतवाल | Published: March 17, 2024 11:56 PM2024-03-17T23:56:31+5:302024-03-17T23:57:00+5:30
Jalgaon News: दोन एकरांतील काढून ठेवलेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून कणसांसह चारा पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरसोली येथील नायगाव शिवारात घडली.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - दोन एकरांतील काढून ठेवलेल्या दादरच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून कणसांसह चारा पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना रविवार, १७ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरसोली येथील नायगाव शिवारात घडली.
शिरसोली येथील शेतकरी बळवंत पाटील यांचे नायगाव शिवारात शेत असून दोन एकरांमध्ये त्यांनी दादरची पेरणी केली हाेती. या पिकाची काढणी करून ते शेतातच चाऱ्यासह ठेवले होते. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक वीज खांबावरील तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले व ठिणग्या दादरच्या पिकावर पडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या पिकाने पेट घेतला आणि काही वेळातच संपूर्ण पीक आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत दादरचे कणसं तसेच चाराही जळून खाक झाला.
आग धगधगत असल्याचे दिसताच ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतमालक बळवंत पाटील यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी शेतात धाव घेतली. त्यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा मारा करण्यासह झाडांच्या फांद्यांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत सर्व पीक जळून खाक झाले होते.
शेतात ठेवलेल्या दादरच्या पिकाचे कणसं व चारा सोमवारी वेगवेगळे करून धान्य घरी नेले जाणार होते. मात्र त्याच्या एक दिवस अगोदरच आगीने हाताशी आलेले उत्पादन हिरावल्या गेले.
सुदैवाने हरभरा पीक सुरक्षित
पाटील यांच्या दादरच्या पिकाशेजारीच हरभरा लावलेला असून ते पीकही उभे आहे. सुदैवाने ही आग शेजारील हरभऱ्याच्या पिकापर्यंत व इतर शेतापर्यंत पोहचली नाही. त्यामुळे हे पीक सुरक्षित राहिले.
आज पंचनामा होणार
आगीच्या घटनेनंतर शेतकऱ्याने महावितरणच्या शिरसोली उपकेंद्रात माहिती दिली, तसेच तलाठ्यांनाही कळविण्यात आले. दोन्ही जणांकडून सोमवारी पंचनामा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.