जळगावची पॉझिटिव्हिटी राज्यात सर्वात कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:50+5:302021-05-08T04:15:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरत असून गेल्या आठवडाभरात जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्हिटी अर्थात अहवालांमधील बाधितांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरत असून गेल्या आठवडाभरात जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्हिटी अर्थात अहवालांमधील बाधितांचे प्रमाण हे घसरून ८.८९ टक्के नोंदविण्यात आले आहे. हे प्रमाण राज्यात सर्वात कमी आहे, त्यामुळे जळगावकरांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. आठवडाभरात ५९ हजार ६० चाचण्या झालेल्या असून त्यात ५२४८ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यात अत्यंत भयावह स्थिती निर्माण झालेली होती. मात्र, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत घट नोंदविण्यात आली. त्यात बरे होणारे अधिक व नवीन रुग्ण कमी अशी दिलासादायक स्थिती कायम राहत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यातच संसर्गाचे प्रमाणही घटत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभराच्या चाचण्या व बाधितांचे प्रमाण यावरून जिल्ह्यात संसर्ग घटल्याचे चित्र समोर आले आहे. मध्यंतरी केवळ जळगाव शहराची पॉझिटिव्हिटी ही ४० टक्क्यांपर्यंत गेलेली हेाती. तर जिल्ह्याची १६ टक्क्यांपर्यंत गेलेली होती. मात्र, ती घटून गेल्या आठवड्यात ८.८९ टक्के नोंदविण्यात आली आहे.
पॉझिटिव्हिटी म्हणजे काय
याचा अर्थ कोरेाना तपासणीच्या शंभर अहवालांमध्ये बाधितांचे प्रमाण किती, यावरून संसर्गाची तीव्रता काढता येते. मध्यंतरी जळगाव शहराची पॉझिटिव्हिटी ही ४० टक्कयांवर पोहोचली होती. याचा अर्थात दर १०० तपासण्यांमध्ये ४० लोक बाधित आढळून येत होते. आता हीच संख्या ८ टक्के अर्थात ८ वर पोहोचली आहे.
पॉझिटिव्हिटीचे टॉप ५ जिल्हे
बुलडाणा ४२.४३ टक्के
अहमदनगर : ४१.५२ टक्के
सातारा ३५.३३ टक्के
हिंगोली ३३.१२ टक्के
बीड ३२.८७ टक्के
जळगाव : ८.८९ टक्के
दैनंदिन पॉझिटिव्हिटी ११ टक्के
आठवड्यास दैनंदिन बाधितांच्या प्रमाणातही जिल्ह्यात घट नोंदविण्यात आली असून ती ११ टक्के नोंदविण्यात आली आहे. यात जिल्ह्यात सर्वात कमी पॉझिटिव्हिटीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. नाशिक जिल्ह्याची दैनंदिन पॉझिटिव्हिटी ही ४४ टक्क्यांपर्यंत नोंदविली गेलेली आहे.