ठिबकमधील पायाभूत कामगिरीमुळे जळगावचे नाव पोहचले जगात - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:18 PM2018-09-16T12:18:35+5:302018-09-16T12:21:19+5:30
पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक
जळगाव : पाण्याचे वाढते महत्व लक्षात घेता शेतीसाठी ठिबकमधील पायाभूत कामगिरीमुळे जळगावचे नाव देशातच नव्हे तर जगात पोहचले आहे, असे प्रतिपदान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
एमआयडीसी भागात रमेश पाटील यांच्या ठिबक साहित्याच्या फॅक्टरीचे उद्घाटन रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात ६० टक्के शेती ही कोरडवाहू आहे. शेतीसाठी पाण्याची गरज ओळखून पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. यासाठी ठिबक तंत्रज्ञान महत्वाचे आहे. जळगावच्या जैन इरिगेशनने ठिबक तंत्रज्ञानात क्रांती करुन जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. शेतीशी निगडीतच हा व्यवसायाचे या ठिकाणी उद्घाटन असल्याने मी आवर्जूून या कार्यक्रमाला आलो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, या आधी विमानतळावर त्यांचे सकाळी दहा वाजेच्या दरम्यान आगमन झाले. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.