जळगाव यंदा राजस्थानपेक्षाही उष्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 08:27 PM2018-05-29T20:27:22+5:302018-05-29T20:27:22+5:30
जळगावच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमानात वाढ होत आहे.
जळगाव : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील तापमानाने अनेक उच्चांक गाठले. वाळवंटी भाग असलेल्या राजस्थानपेक्षाही यंदा जळगावातील उन्हाळा अधिक तीव्र होता.
यावर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांत जळगावचे दिवसाचे सरासरी तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअस होते. याच काळात राजस्थानचे तापमान हे ४१ ते ४३ अंश सेल्सिअस राहिले. त्यामुळे जळगाव यंदा राजस्थानपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक उष्ण राहिले.
ममुराबाद वेधशाळेतील हवामानतज्ज्ञ सुदाम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावच्या वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमानात वाढ होत आहे. तसेच गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेसे पाणी मुरले नव्हते. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने बाष्पीभवनही कमी प्रमाणात होत असल्याने वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे.
जळगाव
महिना - तापमानाची सरासरी
मार्च - ३८ ते ४० अंश
एप्रिल - ४१ ते ४१ अंश
मे - ४४ ते ४५ अंश
राजस्थान
मार्च - ३६ - ३८ अंश
एप्रिल - ४० अंश
मे - ४४ ते ४६ अंश