पाचोरा रस्त्यावर जळगावच्या हॉटेल चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:31 PM2018-02-05T13:31:03+5:302018-02-05T13:35:20+5:30
अज्ञात वाहनाने रविवारी रात्री धडक दिल्याचा संशय
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.५ : शिरसोली येथून जळगावात दुचाकीने घरी येत असलेल्या अशोक बारकू महाजन उर्फ महाराज (वय ४६, रा.जाकीर हुसेन कॉलनी, जळगाव) यांचा रविवारी रात्री साडे आठ वाजता शिरसोली रस्त्यावरील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर अपघातात मृत्यू झाला. महाजन यांना वाहनाने धडक दिली की दुचाकी घसरुन ते कोसळले हे स्पष्ट झालेले नाही.
अशोक महाजन यांची जैन व्हॅली कंपनीला लागूनच हॉटेल आहे. दररोज सकाळी ९ वाजता ते हॉटेलवर जातात व रात्री नऊ वाजेपर्यंत घरी परत येतात. रविवारीही ते घरी येण्यासाठी आठ वाजता हॉटेलवरुन निघाले. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोरच गतिरोधकाजवळ ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. जिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
महाराज म्हणून परिचित
अशोक महाजन हे मुळचे शिंदखेडा येथील रहिवाशी आहेत. रोजगारानिमित्त ते अनेक वर्षापासून जळगावातच स्थायिक झाले. जैन व्हॅली कंपनीत कॅँटीनमध्ये ते कामाला होते. तेथे त्यांना महाराज या टोपण नावाने ओळखायला लागले. मनमिळावू स्वभाव व हाताला चव असल्याने कंपनीनेच त्यांना बाहेर शुध्द शाकाहारी हॉटेल सुरु करण्यासाठी जागा दिली. त्या जागेत त्यांनी हॉटेल सुरु केले होते. महाजन यांचे भाऊ भिका महाजन हे शिंदखेडा नगरपालिकेत नगरसेवक आहेत.