Jalgaon: कसे करायचे असते नाटक, आता विद्यापीठातही अभ्यासक्रम!
By अमित महाबळ | Published: August 30, 2023 05:28 PM2023-08-30T17:28:36+5:302023-08-30T17:28:52+5:30
Jalgaon News: नाट्यशास्त्राचे शिक्षण घेण्याचे खान्देशातील तरूणांचे स्वप्न आता पूर्ण होणार असून, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. (नाट्यशास्त्र) हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू होत आहे.
- अमित महाबळ
जळगाव - नाट्यशास्त्राचे शिक्षण घेण्याचे खान्देशातील तरूणांचे स्वप्न आता पूर्ण होणार असून, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. (नाट्यशास्त्र) हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू होत आहे. नाटक, सिनेमा, दूरचित्रवाणी या क्षेत्रात कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी वाढत असलेली संधी लक्षात घेवून विद्यापीठात नाट्यशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा, अशी अनेक वर्षापासूनची रंगकर्मीची मागणी होती.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या कला व मानव्यविद्या प्रशाळातंर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ परर्फामिंग आर्टस् मध्ये एम. ए. नाट्यशास्त्र हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणामध्ये त्यासाठी मान्यता घेण्यात आली आहे. खान्देशातील कलावंताना नाट्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेण्यासाठी यापूर्वी पुणे, मुंबई किंवा औरंगाबाद येथे जावे लागत असे आता ती गरज भासणार नाही.
अभ्यासक्रमात अभिनय, दिग्दर्शन, रंगमंचाच्या तांत्रिक बाबी, लेखन, नेपथ्य व प्रकाश यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विषयातील पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेवू शकणार आहे. बी. ए. नाट्यशास्त्र किंवा थिअटरविषयक अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे. नाट्यशास्त्रात करिअर करू इच्छुणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व मानव्यविद्या प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. राम भावसार यांनी केले आहे.
एनईपीला अनुसरून अभ्यासक्रम
- शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा अभ्यासक्रम सुरू होत असून, नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना थेअरी व प्रात्यक्षिकांसोबत इंटर्नशिप करावी लागणार आहे.
- केवळ तासिकांचा विचार न करता नाट्य व चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या विविध विषयांवरील कार्यशाळा देखील विभागात भविष्यात घेतल्या जातील.
- सुप्रसिध्द लेखक व दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण व लोककलेचे अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.