Jalgaon: शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक कविवर्य ना.धो. महानोर अनंतात विलीन
By चुडामण.बोरसे | Published: August 4, 2023 06:36 PM2023-08-04T18:36:21+5:302023-08-04T18:37:04+5:30
Jalgaon: शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक असलेले कविवर्य ना.धो. महानोर यांना आज शुक्रवारी सायंकाळी साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.
जळगाव - शेती, माती आणि संस्कृतीचे पाईक असलेले कविवर्य ना.धो. महानोर यांना आज शुक्रवारी सायंकाळी साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पळसखेड या मुळ गावी सायंकाळी ‘सुलोचना बाग’ या महानोरांच्या शेतात त्यांचे धाकटे चिरंजीव डॉ. बाळकृष्ण महानोर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी गोवऱ्या आणि चंदनाच्या फुलांचे हार यांचा उपयोग करण्यात आला. तीन वेळा हवेत फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर महानोर परिवाराच्या सदस्यांनी अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण केले. सायंकाळी ५.१० वाजता कवी महानोर यांच्या पार्थिवावर अग्निडाग देण्यात आला.
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, साहित्यिक रंगनाथ पठारे, सुमती लांडे, श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, कवी दासू वैद्य, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, पुर्णिमा हुंडीवाले, अब्दुल नवाज राही, रंगकर्मी शंभु पाटील आदी उपस्थित होते.
महानोर हे महाकवी आणि रानकवी होते. त्यांच्या शब्दांचाच रंग हिरवा होता. मोठ्या मनाच्या या माणसाने पुन्हा परतून यावे, अशी भावना अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केल्या. श्रीकांत देशमुख यांनी म्हटले की, महानोर हे अजिंठा लेण्यांप्रमाणे एक लेणं होते. गाण्याचा चेहरा बदलणारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलेच कवी होते. रंगनाथ पठारे म्हणाले की, ‘महानोरांनी साहित्याला श्रीमंत केले. आणि त्यांचे देणं कधीही संपणार नाही.’ अंत्यसंस्कार सुरु असतांना ‘पीक करपलं, पक्षी दुर देशी गेला’ हे गीत वाजवण्यात येत होते.