सुरतेत ‘डबल मर्डर’ करणारे दोघे जळगाव एलसीबीच्या ताब्यात
By विजय.सैतवाल | Published: June 28, 2024 10:56 PM2024-06-28T22:56:11+5:302024-06-28T23:01:08+5:30
१६ लाखांची सुपारी घेऊन केले होते खून : एकावर खुनाचे पाच तर दुसऱ्यावर अन्य १५ गुन्हे
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : १६ लाख रुपयांची सुपारी घेवून सुरत येथे दोन जणांचा गळा कापून खून करत फरार असलेल्या दोन कुविख्यात गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून अटक केली आहे. अफजल अब्दुल शेख (३८, रा. उमरपाडा, सुरत) व प्रज्ञेश दिलीप गामीत (२६, रा. तरकुवा डुंगरी फलिया, जि. तापी, गुजरात) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांनी खुनाची कबुली दिली असून एकावर खुनाचे पाच तर दुसऱ्यावर १५ वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.
या संदर्भात पोलिस दलाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सुरत येथील दुहेरी खून प्रकरणात अटक केलेल्या अफजल अब्दुल शेख व प्रज्ञेश गामीत या दोघांनी कबुली देताना सांगितले की, १६ लाख रुपयांची सुपारी दिल्याने सुरत येथील दोन जणांचा गळा कापून खून केला होता. ८ जून रोजी ही घटना घडल्यानंतर हे दोघे जण फरार होते.
गुजरात पोलिसांचे ११ पथक मागावर
फरार असलेल्या या दोघांच्या शोधार्थ गुजरात पोलिसांचे ११ पथक त्यांच्या मागावर होते. दोन्ही सराईत गुन्हेगार जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ अक्रम शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोकॉ सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
दोघांवर गंभीर गुन्हे दाखल
जळगाव पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता अफजल अब्दुल शेख याच्यावर खुनाचे पाच गुन्हे दाखल आहे तर प्रज्ञेश गामीत याच्यावर वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहे.