जळगाव एलसीबीची धुरा बबन आव्हाड यांच्याकडे; सध्या अतिरिक्त पदभार, आचारसंहितेनंतर होणार कायम?
By विजय.सैतवाल | Published: June 12, 2024 10:55 PM2024-06-12T22:55:37+5:302024-06-12T22:56:40+5:30
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे ३१ मे रोजी निवृत्त झाले. हे पद रिक्त झाल्यामुळे अतिरिक्त पदभार जळगाव सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला होता.
त्यानंतर आता बुधवार, १२ जून रोजी हा पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता काळात एलसीबीच्या प्रमुख पदाची नियुक्ती थांबली आहे.
एलसीबीच्या प्रमुख पदासाठी आव्हाड यांच्यासह पोलिस निरीक्षक किरण शिंदे, जयपाल हिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र त्यात आव्हाड यांचीच वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यात बुधवारी आव्हाड यांच्याकडेच हा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त पदभार कायम राहू शकतो, असेही वृत्त आहे.