जळगावात भाजपाच्या पाटलांची मुसंडी, गुलाबराव देवकर पराभवाच्या छायेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:57 PM2019-05-23T12:57:12+5:302019-05-23T12:58:24+5:30
Jalgaon Lok Sabha Election Results 2019 : भाजपाच्या उन्मेष पाटील यांनी जवळपास 1 लाख 40 हजार मतांनी आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.
जळगाव - लोकसभा निवडणुकीसाठी जळगावलोकसभा मतदार संघात 56.11 तर रावेर लोकसभा मतदार संघात 61.40 टक्के मतदान झाले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात प्रमुख लढत असून रावेर मतदारसंघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे विरूद्ध कोंग्रेसचे डॉ.उल्हास पाटील अशी रंगत आहे. खानदेशमधील या दोन्ही मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपाच्या उन्मेष पाटील यांनी जवळपास 1 लाख 40 हजार मतांनी आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांनी 2,35, 646 मते घेतली आहेत. तर, पाटील यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना 92,471 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिसर्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीच्या अंजली रत्नाकर बावीस्कर असून त्यांना 12829 मते मिळाली आहेत. दुपारी 12.30 वाजेपर्यंत सात फेर्यातील ही मतमोजणीची आकडेवारी आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात पुरुष मतदार 10,08,818, स्त्री मतदार 9,16,470, इतर मतदार 64 असे एकूण मतदार 19,25,352 मतदार होते. त्यापैकी पुरुष 5,84,465, स्त्री 4,95,815, इतर 13 असे एकूण 10,80,293 मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला. त्यानुसार मतदार संघातील मतदानाची टक्केवारी पुरुष 57.94 टक्के, स्त्री 54.10 टक्के, इतर 20.31 टक्के अशी एकूण 56.11 टक्के इतकी आहे.