ठाकरे गटात प्रवेश अन् गळ्यात धनुष्यबाणाचा मफलर; उन्मेष पाटील यांचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:40 PM2024-04-04T23:40:27+5:302024-04-04T23:41:04+5:30
loksabha Election 2024: जळगाव लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाने तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी पक्षाला रामराम केला. बुधवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
प्रशांत भदाणे
जळगाव - नुकतेच शिवसेना उबाठा गटात प्रवेश केलेले जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन बुधवारी ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर प्रवेश केल्यानंतर ते गुरुवारी सायंकाळी जळगावात परतले. याठिकाणी मोठ्या जल्लोषात उन्मेष पाटलांचं स्वागत झालं. परंतु यावेळी झालेल्या एका नजरचुकीमुळे उन्मेष पाटलांचा फोटो व्हायरल होऊ लागला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांनी उन्मेष पाटलांची ही चूक हेरली. उन्मेष पाटलांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यांची निशाणी पेटलेली मशाल अशी आहे. मात्र जळगावात पोहचल्यानंतर पाटलांच्या गळ्यात एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा म्हणजे धनुष्यबाण चिन्ह असलेला मफलर दिसून आला.
याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील म्हणाले की, अनेक वर्ष उन्मेष पाटील हे महायुतीचं काम करत आलेत. महायुतीच्या बळावर ते खासदारही झाले. मागच्यावेळी शिवसेनेने प्रामाणिकपणे त्यांचे काम करून जळगावमधून निवडून दिले. आज जळगावात त्यांचे स्वागत झाले तेव्हा धनुष्यबाण असलेला गमछा दिसला. त्यांच्या मनात आजही शिवसेनेबद्दल आदर आहे हे लोकांसमोर सिद्ध झालं आहे. उन्मेष पाटलांना कदाचित त्यांच्याकडून चूक झाल्याची जाणीव झालेली असावी. त्यामुळे उन्मेष पाटील हे कदाचित त्यांचा निर्णय बदलू शकतात असंही त्यांनी म्हटलं.
नेमकं काय घडलं?
बुधवारी उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर गुरुवारी ते जळगावात पोहचले तेव्हा रेल्वे स्टेशनपासून निघालेली मिरवणूक आटोपल्यानंतर उन्मेष पाटील आणि इतर नेते शिवसेनेच्या कार्यालयात आले तेव्हा मात्र घडलेली चूक त्यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला मफलर काढला आणि ठाकरेंच्या मशाली चिन्हाचा मफलर गळ्यात घातला.