जळगाव व रावेरसाठी मतमोजणी सुरू, पण मतदान केंद्राबाहेर शुकशुकाट
By सुनील पाटील | Published: June 4, 2024 11:27 AM2024-06-04T11:27:26+5:302024-06-04T11:28:09+5:30
Jalgaon Lok Sabha Election Result 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील एफसीआय गोदामात सकाळपासून मतमोजणी सुरू झालेली आहे.
सुनील पाटील,जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील एफसीआय गोदामात सकाळपासून मतमोजणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत सात राऊंड झाले असून, जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अनुक्रमे स्मिता वाघ व रक्षा खडसे यांनी आघाडी घेतलेली आहे. मतदान केंद्राच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असला तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते समर्थक यांची मात्र अजून फारशी गर्दी झालेली नाही. साडेअकरा वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर तुरळक कार्यकर्ते होते.
मतदान केंद्राबाहेर तसेच महामार्गावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली होती. कार्यकर्ते व समर्थकांच्या वाहनांसाठी समांतर रस्त्याला लागून व्यवस्था करण्यात आलेले आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी एफसीआय गोदामाच्या बाजूला असलेल्या एका कंपनीच्या आवारात मोकळ्या जागेत वाहनांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे गर्दी व गोंधळ टाळता येणे शक्य झाले आहे.