जळगावात मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त, सार्वजनिक वाहतूकही प्रतिबंधित
By विजय.सैतवाल | Published: June 4, 2024 12:05 PM2024-06-04T12:05:32+5:302024-06-04T12:05:46+5:30
Jalgaon lok sabha election result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मुख्य रस्त्यापासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विजयकुमार सैतवाल, जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मुख्य रस्त्यापासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी वखार महामंडळाच्या गोदामात करण्यात येत आहे. यासाठी पहाटे पाच वाजेपासून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. समांतर रस्त्यावरदेखील पोलीस बंदोबस्त आहे. याशिवाय वखार महामंडळाच्या गोदामात मतदान यंत्र ठेवल्यापासून कायम असलेल्या बंदोबस्तासह मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मतमोजणी कक्षात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार व अन्य परवानगी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मोबाईल नेण्यापासून रोखण्यात आले.
तगडा पोलीस बंदोबस्त-
मतमोजणी ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, चार पोलीस निरीक्षक, २२ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, ४०० पोलिस कर्मचारी, तीन आरसीपी प्लाटून, दोन एसआरपी प्लाटून, दोन सीआरपीएफ तुकड्या तैनात होते. सर्व घडामोडींवर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे लक्ष ठेवून आहेत.
मतमोजणी केंद्रासमोरील रस्ता बंद-
मतमोजणी केंद्र असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामासमोरील रस्ता मंगळवार, ४ जून रोजी पहाटे पाच वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणाहून सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे.