Jalgaon: ‘लम्पी’चे संकट : ७ तालुक्यातील गुरांचे बाजार बंद! आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू, लसीकरणाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:24 PM2023-08-24T17:24:47+5:302023-08-24T17:25:31+5:30
Jalgaon: जळगाव : जिल्ह्यातील सात तालुक्यात ‘लम्पी’ आजाराने थैमान घातले आहे.४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
- कुंदन पाटील
जळगाव - जिल्ह्यातील सात तालुक्यात ‘लम्पी’ आजाराने थैमान घातले आहे.४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ‘लम्पी’ला रोखण्यासाठी सात तालुक्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अमळनर व धरणगाव तालुक्यात ‘लम्पी’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात लम्पीने ४३४ जनावरांना हेरले आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यात १७५ पशुधनाच्या आयुष्यावर लम्पीचे संकट उभे ठाकले आहे. ‘लम्पी’ला आवर घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पशुसंवर्धन उपायुक्त शामकांत पाटील यांनी अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेश होईपर्यंत सातही तालुक्यातील गुरांचे भरणारे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात व अन्य राज्यातून होणारी पशुधनाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस व आरटीओ प्रशासनाने आंतरराज्य सिमेवर कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. लसीकरण करुन २८ दिवस पूर्ण झालेल्या जनावरांची वाहतूक मात्र करता येणार आहे. मात्र त्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
तालुकानिहाय बाधीत व मृत जनावरे
धरणगाव १६-०१
पारोळा ५२-०७
जळगाव ०३-००
एरंडोल ६७-०८
पाचोरा ६५-०५
चोपडा ०४-००
चाळीसगाव १७५-५२
भडगाव ०७-०६
अमळनेर ४५-०१
एकूण ४३४-७९