जळगावात विद्येच्या मंदिरात मद्यपींची भरतेय शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 03:08 PM2017-12-07T15:08:58+5:302017-12-07T15:16:46+5:30
शिक्षक, कर्मचाºयांना रोज फेकाव्या लागतात दारुच्या बाटल्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.७ : शहरातील शिवतिर्थ मैदान परिसरातील जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेच्या आवारात रोज रात्री मद्यपींचा अड्डा भरत आहे. मद्यपींकडून शाळेच्या आवारातच दारुच्या बाटल्या फेकल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, शाळेतील शिक्षक व शिपायांना या दारुच्या बाटल्या रोज जमा करून फेकाव्या लागत आहेत. मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे शिक्षक व पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेच्या परिसर अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी ३० ते ४० मद्यपींचा खास अड्डा बनला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून या ठिकाणी दारुच्या पार्ट्या रंगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच रात्रीच्या पार्ट्या संपल्यानंतर रोज सकाळी शाळेच्या आवारात दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. अनेकदा मुख्य प्रवेशव्दाराजवळच या बाटल्या पडलेल्या असतात. विद्यानिकेतन शाळेसह पंचायत समिती व गट शिक्षणाधिकाºयांचा कार्यालयाच्या आवारात देखील या बाटल्या पडलेल्या असतात.
३०-४० युवकांचा असतो घोळका
रात्री ९ वाजेनंतर या ठिकाणी मद्यपींचा अड्डा सुरु होतो. मद्यपींमध्ये युवकांची मोठ्या प्रमाणात संख्या असून दररोज या ठिकाणी ३० ते ४० मद्यपींचा घोळका या ठिकाणी दररोज असतो. दरम्यान, रात्रीच्या वेळी पोलीसांच्या गस्ती पथकाकडून शहरात पाहणी होते. मात्र या ठिकाणी दररोज सुरु असलेल्या अड्याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. बुधवारी शाळेतील शिक्षकांनी ‘लोकमत’ ला याबाबतची माहिती दिल्यानंतर, सकाळी १० वाजेच्या सुमारास शाळा सुरु होण्याअगोदर ‘लोकमत’च्या चमुने या ठिकाणी पाहणी केली असता, ठिक-ठिकाणी दारुच्या बाटल्या दिसल्या. शिवतिर्थ मैदानाला सुरक्षा भिंत तयार करण्यात आली असली, तरी जिल्हा ग्रामीण विकास केंद्राकडील दरवाजा उघडाच असतो.
शिक्षण विभागाकडे केली अनेकदा तक्रार...
गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून याबाबत जि.प.विद्यानिकेतनच्या प्राचार्यांनी शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार देखील केली. त्यानंतर शिक्षण विभागाकडून या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र काही महिन्यातच सुरक्षा रक्षक ाचे देखील येणे बंद झाले. यामुळे मद्यपींना या ठिकाणी मोकळे रान मिळाले आहे. दरम्यान, बुधवारी देखील विद्यानिकेतन शाळेचे प्राचार्य व शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांकडे या प्रकाराबाबत तक्रार दिली आहे.