मृत्यू झालेल्या कर्मचा-याला जळगाव मनपाने दिली बडतर्फीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:12 PM2017-11-01T12:12:40+5:302017-11-01T12:19:14+5:30
प्रशासनाच्या ‘डुलक्या’ : तीन दिवसात मागविला खुलासा
चंद्रशेखर जोशी / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या महापालिकेतील लिपीक पदावरील अनिल बळीराम सोनवणे या कर्मचा:याला प्रशासनाने बडतर्फीची अंतीम कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून तीन दिवसात लेखी खुलासा मागविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपा प्रशासनाच्या या अजब कारभाराची मनपा वतरुळात चर्चा आहे.
मनपातील कर्मचा-यांच्या कामकाजाबाबत प्रभारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त करून त्यांना समज देत बडतर्फीचा इशारा दिला होता. तरीही अनेकांकडून दांडी मारण्याचे प्रकार सुरूच असल्याचे लक्षात आल्याने आता कारवाई सत्र हाती घेण्यात आले आहे.
62 जणांना दिली नोटीस
गेल्या आठवडय़ात 27 रोजी प्रभारी आयुक्त निंबाळकर यांच्या स्वाक्षरीने 62 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यात मनपातून निलंबित करण्यात आलेल्या 17 कर्मचा:यांना महापालिका अधिनियम 1949 चे कलम 56 नुसार आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा तीन दिवसांच्या आत सादर करावा असे कळविण्यात आले होते. तर 45 जणांवर निलंबनाची कारवाई न करता थेट बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली होती. या 45 जणांकडूनही लेखी खुलासा विभाग प्रमुखांमार्फत सादर करण्यात यावा असे त्यांना कळविण्यात आले होते.
नोटीस बजावलेल्यांची धावपळ
महापालिकेने निलंबित केलेल्या 17 जणांना बजावलेल्या बडतर्फीची व अन्य 45 जणांना बजावलेली अंतिम बडतर्फीची नोटीस मिळाल्याने या कर्मचा:यांची धावपळ सुरू झाली आहे.
नोटीस दिलेल्या या कर्मचा:यांनी वकीलांचे मार्गदर्शन घेऊन नोटीसीला उत्तर दिले आहे. या कर्मचा:यांनी महापौर ललित कोल्हे व उपायुक्त चंद्रकांत खोसे यांचीही भेट घेतली. जे दांडी बहाद्दर असतील त्यांच्यावर कारवाई करा आम्ही पुरावे देण्यास तयार आहोत पण एकदम कारवाई करू नका अशी भूमिका या कर्मचा-यांनी मांडली. मात्र कारवाई ही जिल्हाधिका:यांची असल्यामुळे यात कोणीही बोलण्यास तयार नाही.
45 जणांच्या यादीत मयत कर्मचारी
27 रोजी बडतर्फीची अंतीम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या 45 जणांच्या यादीतील सातव्या क्रमांकावरील कर्मचारी अनिल बळीराम सोनवणे (वय 47) हे मनपात पाणी पुरवठा विभागात लिपीक म्हणून कार्यरत होते. शहरातील शनिपेठ परिसरातील रिधुरवाडा येथे ते रहात असत. त्यांचे 30 ऑगस्ट 2017 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. विशेष म्हणजे मनपाच्या दप्तरीच त्यांच्या मृत्यू झाला असल्याची नोंदही आहे. त्यांनाच बडतर्फीची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. प्रशासनाच्या डुलक्यांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबतची चर्चा मनपात जोरदार सुरु
वरदहस्त असलेल्यांवर अद्यापही कारवाई नाही
महापालिकेतील अनेक कर्मचा:यांवर कुणाचा न कुणाचा वरदहस्त असल्याने हे कर्मचारी मनपात स्वाक्षरी करून आजी माजी नगरसेवकांच्या पुढे मागे फिरत असतात. त्याचे परिणाम मनपाच्या कामकाजावर होत असल्याचे लक्षात आल्याने मनपा प्रशासनाने कारवाई सत्र सुरू केले आहे. अद्यापही काही वरदहस्त असलेल्यांवर कोणतीही कारवाई नसल्याने मनपात कारवाई झालेल्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. ही कारवाई करत असताना मात्र घाईघाईत कुणालाही नोटीसा बजावण्याची प्रक्रिया प्रशासकीय अधिका:यांकडून सुरू असल्याचे आता समोर येत आहे.
किती लोकांकडून खुलासे सादर झाले याची माहिती घेतली नाही. तसेच मयत कर्मचा:याचे नाव बडतर्फीची नोटीस दिलेल्यांच्या यादीत आहे काय? हे तपासून पाहिले जाईल व चौकशी केली जाईल.
-किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी तथा मनपा प्रभारी आयुक्त