जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:48 AM2018-11-21T11:48:39+5:302018-11-21T12:03:03+5:30
बाजारगप्पा : जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा
- विजयकुमार सैतवाल (जळगाव)
जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक सुरू झाली असून, जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून गहू, ज्वारी, बाजरी, दादर यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात झालेली वाढ थांबून या सर्वांचे भाव स्थिर राहण्यासह डाळींचे भाव कमी झाले आहेत.
नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, छत्तीसगड, मध्यप्रदेशसह गोंदिया, तुमसर या भागातून नवीन तांदूळ येऊ लागला आहे. नवीन चिनोर तांदळाचे भाव ३००० रुपये प्रतिक्विंटल असून, जुन्या चिनोर तांदळाचे भाव ३४०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सध्या आवक कमी असली तरी १५ दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादन घटण्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी सुरू होती; मात्र या आठवड्यात डाळींचे भाव कमी झाले आहेत. यात मात्र मुगाच्या डाळीचे भाव स्थिर आहेत.
गेल्या आठवड्यात ७५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल असलेली मुगाच्या डाळीचे भाव या आठवड्यातदेखील ७५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल स्थिर आहेत. उडदाच्या डाळीचे भाव कमी होऊन ती ६५०० ते ६९०० रुपयांवरून ६००० ते ६४०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. गेल्या आठवड्यात ६५०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटलवर असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६००० ते ६४०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत, तर तूरडाळदेखील ६६०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलवरून ६४०० ते ६८०० रुपये प्रतिक्विंटलवर आली आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत, तसेच चांगल्या दर्जाच्या उडदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.
गव्हाचे भाव स्थिर
दिवाळीच्या काळात गव्हाला मागणी वाढल्याने गेल्या आठवड्यात १०० रुपये प्रतिक्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली होती; मात्र या आठवड्यात हे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा आहे. १४७ गहू २६५० ते २७५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे, तसेच लोकवन गहू २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रतिक्विंटल, चंदोसी ३८५० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहे. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. ज्वारी, बाजरी, तसेच दादरचे भावदेखील या आठवड्यात स्थिर आहेत. ज्वारीचे भाव २००० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, बाजरी २३०० रुपये प्रतिक्विंटल, दादर ३००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.