जळगावच्या बाजारपेठेमध्ये डाळींसह धान्याच्या भावात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:44 AM2018-11-14T11:44:43+5:302018-11-14T11:45:12+5:30
बाजारगप्पा : जळगावच्या बाजारपेठेमध्ये डाळींसह गहू, ज्वारी, बाजरी, दादर यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे.
- विजयकुमार सैतवाल, जळगाव
जळगावच्या बाजारपेठेमध्ये डाळींसह गहू, ज्वारी, बाजरी, दादर यांना मागणी वाढल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. डाळींची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सलग तिसऱ्या आठवड्यात डाळींच्या भावात वाढ झाली आहे. तांदूळ स्थिर असल्याने तेवढा दिलासा असल्याचे मानले जात आहे. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून त्यांचे भाव तीन आठवड्यांपासून वाढत आहेत. यामध्ये ऐन उडीद, मुगाची आवक असणाऱ्या काळातच उडीद, मूग, तसेच डाळींमध्ये व ज्वारी, बाजरीच्या भावात वाढ सुरू आहे.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादन घटण्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. उडीद, मुगाचे उत्पादन कमी होऊन आवक घटल्याने डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत आहे. या आठवड्यात तर गव्हाचेही भाव वाढले असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली. गेल्या आठवड्यात ७४०० ते ७८०० रुपये प्रतिक्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे.
उडदाच्या डाळीतही वाढ होऊन ती ६४०० ते ६८०० रुपयांवरून ६५०० ते ६९०० रुपये प्रतिक्विंटल झाली. गेल्या आठवड्यात ६२०० रुपये प्रतिक्विंटलवर असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६५०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत, तर तूरडाळदेखील ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटलवरून ६६०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल झाले आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाचे भाव ६६७५ रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत, तसेच चांगल्या दर्जाच्या उडदाचे भावदेखील ५६०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.
अनेक ग्राहक आपल्या घरात सहा महिन्यांसाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे उन्हाळ्यानंतर आता पुन्हा दिवाळीच्या काळात गव्हाला मागणी वाढल्याने या आठवड्यात १०० रुपये प्रतिक्विंटलने गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. १४७ गहू २५५० ते २६५० रुपयांवरून २६५० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल, लोकवन गव्हाचा भाव २५५० ते २६०० रुपये, शरबती गहू २७५० ते २८५० रुपये प्रतिक्विंटल, चंदोसीचा भाव ३८५० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले.