जळगावच्या बाजारपेठेत धान्य, डाळींमध्ये तेजी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:45 PM2019-05-09T12:45:00+5:302019-05-09T12:46:06+5:30
विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने त्यांचे ...
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने त्यांचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी स्थिर असलेल्या डाळींमध्ये गेल्या आठवड्यापासून भाववाढ होत असून या आठवड्यात गव्हामध्येही वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. तांदळालादेखील मागणी कायम असल्याने त्यांचेही भाव वाढले आहे.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून कडधान्याची आवक कमी असल्याने उडीद-मुगाच्या डाळीवर परिणाम झाला आहे. हा फटका अद्यापही कायम असून या सोबतच आता कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध आल्याने डाळींचे भाव आणखी वाढत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ७७०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८१०० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीत गेल्या आठवड्यात २०० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५७०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५७०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. तसेच तूरडाळीचेदेखील भाव ७८०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवरुन ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.
गव्हातही तेजी
अनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे गव्हाला मागणी वाढल्याने गेल्या महिन्यात गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली होती. मात्र गव्हाची आवक चांगली असल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून गव्हाचे भाव स्थिर होते. मात्र आता त्यातही वाढ झाली आहे. २२०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २२०० ते २२५० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३७०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.
तांदुळाचेही भाव वाढले
तांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या तांदळाच्या भावातही वाढ झाली आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचेले आहेत.