जळगावचा पारा ४६ अंशावर, उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:33 PM2019-04-26T12:33:53+5:302019-04-26T12:34:22+5:30
नऊ वर्षानंतर चढला पारा
जळगाव : यंदाच्या तापमानाने उच्चांक गाठला असून, स्कायमेट या खासगी हवामान खात्याचा अंदाजानुसार गुरुवारी शहरात ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात तब्बल ९ वर्षानंतर पहिल्यांदाच पारा ४६ अंशापर्यंत पोहचला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या कोरड्या व उष्ण वाऱ्यांचे प्रमाण वाढणार असल्याने २६ ते २८ एप्रिल दरम्यान शहरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
महिनाभरापासून जळगावकरांना तापमानाचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. गुरुवारी तापमानाने ४६ अंशावर उसळी घेतली होती. त्यामुळे नागरिक प्रचंड तापमानाने अक्षरश घामाघूम होत आहेत. एप्रिल महिन्यातच तापमानाने ४५ अंशाचा पारा पार केल्यामुळे मे महिन्यात तापमानाचा पारा उच्चांक गाठण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एप्रिल २०१० मध्ये तापमानाचा पारा ४६ अंशावर पोहचला होता. त्यानंतर एप्रिल २०१७ व २०१८ मध्ये ४५ अंशावर तापमानाचा पारा गेला होता. यंदा मे महिन्यात पारा आणखीनच वाढण्याची भीती हवामान खात्यातून वर्तविण्यात आली आहे.
तीन दिवस उष्णतेची लाट
आगामी तीन दिवस पूर्वेकडून येणाºया कोरड्या व उष्ण वाºयांचे प्रमाण वाढणार असल्याने २६ ते २८ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तापमान वाढीसह वाºयांचा वेग देखील ११ ते १४ किमी प्रतितास असल्याने उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. पुढील तीन दिवस नागरिकांनी महत्वाचे काम असेल तरच बाहेर निघण्याचे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले असून, दुपारच्या वेळेस घराबाहेर निघताना पांढरा रुमाल, गॉगलचा वापर करण्याचा सल्ला देखील देण्यात येत आहे. दरम्यान, या दिवसात जास्तीत पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
अंगाची लाही-लाही, अन् घामाच्या धारा
प्रचंड तापमानामुळे घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत असून, घरात पंखा लावूनही घामाच्या धारा वाहत असल्याने उन्हाळा नागरिकांना आता असह्य होवू लागला आहे. दुपारच्या वेळेस मुख्य रस्ते निमर्नुष्य होत असून, आकाशात चिटपाखरूही पहायला मिळत नाही.