जळगावात पारा आणखी घसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 07:24 PM2018-12-31T19:24:16+5:302018-12-31T19:26:49+5:30
आगामी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, किमान पारा आणखीन खाली घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगाव : आगामी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, किमान पारा आणखीन खाली घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यंदाच्या थंडीने अनेक वर्षांचे नीचांक मोडीत काढले असून, सलग तीन दिवसांपासून जळगाव शहराचा पारा ६ अंशांवर कायम आहे.
उत्तरेत सुरू असलेल्या जबरदस्त बर्फवृष्टीमुळे शीत वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आठवडाभरापासून किमान तापमान १० अंशांच्या खालीच आहे. किमान तापमानासह कमाल तापमानातदेखील मोठी घट झाली असून, चार दिवसात तब्बल पाच अंशांची घट झाली आहे. सध्या शहराचा पारा सरासरी तापमानात पाच अंशांपेक्षा खाली आल्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.
एकीकडे गुलाबी थंडीचा आनंद युवकांकडून घेतला जात असताना दुसरीकडे हीच गुलाबी थंडी ज्येष्ठ नागरिकांसाठी धोक्याची ठरत आहे. हृदयरोग व संधीवाताच्या रुग्णांना थंडीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
सर्दी, तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच लहान मुलांनादेखील थंडीमुळे त्रास होत आहे.
आठवडाभर थंडीचा ‘प्रकोप’ कायम राहणार
उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कुठलाही अडसर या वाºयांना सध्या नसल्याने आठवडाभर उत्तर महाराष्टÑात थंडीचा प्रकोप कायम राहणार आहे. दरम्यान, कर्नाटक व केरळ किनारपट्टी लगत चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे.
मात्र, महाराष्टÑाच्या किनारपट्टी लगत यायला या वादळाला उशीर लागणार आहे. तसेच महाराष्टÑापर्यंत येताना हे वादळ नष्टदेखील होऊ शकते. त्यामुळे वातावरणात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याची माहिती कुलाबा वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञ नीता शशिधरण यांनी दिली आहे.
आगामी पाच दिवसातील तापमानाचा अंदाज
दिवस कमाल किमान
३१ डिसेंबर ६ अंश २६
१ जानेवारी ६ अंश २५
२ जानेवारी ५ अंश २४
३ जानेवारी ४ अंश २५
४ जानेवारी ५ अंश २६