जळगावच्या खासदारांची केंद्राकडे १५ कोटींची उधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:18 AM2021-02-09T04:18:36+5:302021-02-09T04:18:36+5:30
जळगाव : खासदार दत्तक गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासदारांनी गावे दत्तक घेतली, तेथे कामे झाली खरी मात्र यासाठीचा तब्बल १५ ...
जळगाव : खासदार दत्तक गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासदारांनी गावे दत्तक घेतली, तेथे कामे झाली खरी मात्र यासाठीचा तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडे थकला आहे. यात खासदार रक्षा खडसे यांच्यासह माजी खासदार ए.टी. पाटील व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या निधीचा समावेश आहे.
२०१४ मध्ये खासदार दत्तक गाव योजना राबवून खासदारांनी त्या गावांमध्ये विकास कामे करावी, असा निर्णय झाला. यामध्ये एकेका खासदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये खासदार रक्षा खडसे व तत्कालीन खासदार ए.टी. पाटील यांनी गावे दत्तक घेत, तेथे कामे प्रस्तावित केली. या कामांना मान्यता मिळून खासदार रक्षा खडसे यांनी दत्तक घेतलेल्या खिर्डी, ता.रावेर व ए.टी. पाटील यांनी दत्तक घेतलेल्या लोहटार, ता.पाचोरा येथे ही कामे झाली. मात्र, दोन्ही खासदारांचा कार्यकाळ संपत आला असताना, झालेल्या कामांपैकी दोघही खासदारांचा प्रत्येकी केवळ अडीच कोटी रुपयांचा निधी आला. मात्र, यामध्ये दोघांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपयांची कामे झाली होती. यापैकी केवळ अडीच-अडीच कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, दोघांचे मिळून एकूण पाच कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणे बाकी आहे.
गेल्या वर्षाचाही निधी अडकला
२०१४मधील निधी अडकलेला असताना, आता पुन्हा २०१९-२० या आर्थिक वर्षात खासदार रक्षा खडसे यांनी चांगदेव, ता. मुक्ताईनगर व खासदार उन्मेष पाटील यांनी सांगवी, ता.चाळीसगाव या दत्तक घेतलेल्या गावांमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानुसार, ही कामेही झाली. मात्र, यासाठी केवळ प्रत्येकी अडीच कोटी रुपयेच निधी आला. २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपत असतानाच कोरोनाचा संसर्ग पसरला व सर्वच निधी मिळणे बंद झाला. त्यात दोघंही खासदारांचे प्रत्येकी अडीच कोटी निधी मिळणे बाकी आहे.
यंदाचे पाच कोटी आलेच नाही
योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून भुसावळ तालुक्यातील तळवेल गावाची निवड करण्यात आली. मात्र, हे आर्थिक वर्ष संपत आले, तरी त्यांचा पाच कोटींचा निधी आलाच नाही. खासदार उन्मेष पाटील यांच्या निधीतून या वर्षात गाव प्रस्तावित नव्हते.