जळगाव महापालिकेच्या आयुक्तांची खुर्ची वाचली! विशेष महासभा तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2023 11:58 AM2023-08-01T11:58:09+5:302023-08-01T11:59:35+5:30
अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाल्याने आयुक्त विद्या गायकवाड यांचं पारडं जड राहिलंय.
प्रशांत भदाणे, जळगाव: महापालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी बोलावलेली विशेष महासभा कोरम अभावी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलीय. त्यामुळे आयुक्त विद्या गायकवाड यांची खुर्ची वाचली आहे. या विशेष महासभेला महापौर, उपमहापौरंसह केवळ चारच नगरसेवकांची उपस्थिती होती.
कोरम पूर्ण होऊ न शकल्याने ही विशेष महासभा तहकूब करण्याची विनंती भाजपचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी केली. त्यानुसार महापौरांनी ही महासभा अनिश्चित काळासाठी तहकुब खूप केली. या महासभेला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. अश्विन सोनवणे, शुचिता हाडा, ज्योती चव्हाण, महेश चौधरी यांच्यासह आयुक्त विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे यांची उपस्थिती होती.
दरम्यान या महासभेत आयुक्त विद्या गायकवाड यांनी एक खुलासा महापौरांकडे सादर केलाय. त्यात आयुक्तांनी म्हटले आहे की, मी आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून मनपाला आर्थिक शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले. विकास कामांना योग्य पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. असं असताना मी विकासकामात खोडा घालत असल्याचं म्हणणं एका प्रशासकीय अधिकाऱ्याचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असं आयुक्तांनी आपल्या खुलाश्यात म्हटलं आहे.
तर महापौर जयश्री महाजन प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, नगरसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाची कल्पना त्यांच्या वरिष्ठांना नव्हती. त्यामुळे हा सारा गोंधळ निर्माण झाला होता. आंदोलन करण्यापेक्षा चर्चेतून हा प्रश्न सोडवता आला असता, असा चिमटा देखील यावेळी महापौरांनी भाजप आणि शिंदे गटाला काढला. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपोषणाला आपला पाठिंबा नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
आयुक्त यांचं पारडं जड-
जळगाव महापालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या मागणीसाठी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांना आपली तलवार म्यान करावी लागली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात मध्यस्थी केल्याने नगरसेवकांची अडचण झालीय. अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाल्याने आयुक्त विद्या गायकवाड यांचं पारडं जड राहिलंय.