कचऱ्याचा प्रश्नावर जळगाव मनपात सत्ताधारी - विरोधक एकमेकांना भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:34 PM2019-08-30T12:34:48+5:302019-08-30T12:35:09+5:30

मक्ता रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

Jalgaon Municipal Authority - On the question of waste | कचऱ्याचा प्रश्नावर जळगाव मनपात सत्ताधारी - विरोधक एकमेकांना भिडले

कचऱ्याचा प्रश्नावर जळगाव मनपात सत्ताधारी - विरोधक एकमेकांना भिडले

Next

जळगाव : सफाईसाठी ७५ कोटी रुपयांचा मक्ता दिल्यावर देखील शहरात निर्माण झालेल्या कचºयाचा प्रश्नांवर गुरुवारी झालेली महासभा चांगलीच गाजली. सत्ताधाºयांकडून मक्तेदाराच्या चुकांवर पांघरून घातल्याचा आरोप शिवसेनेने केल्याने सत्ताधारी सदस्यांनी तीव्र विरोध केला. याच मुद्यावर शिवसेना व भाजपचे सदस्य एकमेकांना भिडल्याने सभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची महासभा गुरुवारी झाली. यावेळी उपमहापौर डॉ. अश्निन सोनवणे, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. महासभेच्या सुरुवातीलाच शहरात निर्माण झालेल्या कचºयाचा प्रश्नावर भाजपा सदस्य कैलास सोनवणे यांनी लक्षवेधी मांडली. त्यानंतर याच प्रश्नावर शिवसेनेचे सदस्य नितीन लढ्ढा यांनी देखील लक्षवेधी मांडत सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देवून मोठी घोडचूक सत्ताधाºयांनी केल्याचा आरोप करत हा मक्ता रद्द करण्याची त्यांनी मागणी केली.
करार बेकायदेशीर
संबधित मक्तेदाराशी केलेला करार हा बेकायदेशिर असल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला. एलईडीच्या मक्ताप्रमाणेच सफाईचा मक्ता देखील अविवेकी पध्दतीनेच घेतला असल्याचेही लढ्ढा म्हणाले. तसेच दंड वसूल करण्यासाठी हा मक्ता दिला नसून, आताच कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव महापालिके प्रमाणेच धुळे महापालिकेने देखील याच मक्तेदारासोबत करार केला असून, त्या ठिकाणी देखील मक्तेदाराविरोधात अनेक तक्रारी असल्याचे विष्णू भंगाळे यांनी सांगितले.
सफाईचा मक्ता हा ‘क्रिप्टो करन्सी’ सारखा - नितीन लढ्ढा
नितीन लढ्ढा यांनी सांगितले की, तब्बल ७५ कोटी रूपयांचा हा मक्ता देण्यात आला असून, त्याआधी नागरिकांकडून स्वच्छतेच्या नावाखाली अतिरीक्त कर देखील मनपाकडून आकारला जात आहे. मात्र, नागरिकांना त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याचे आढळून येत आहे. जळगावची सफाईचा मक्ता हा ‘क्रिप्टो करन्सी’ सारखा झाला आहे. हा दिसायला खूप मोठा वाटतो मात्र प्रत्यक्षात केवळ एक आभासी चित्र आहे. ७५ कोटींचा मक्ता १०० घंटागाड्या या केवळ दिखावू असून, काम मात्र कवळीचे होत नाही.
सोनवणेंनी मांडलेल्या लक्षवेधीत काढल्या मक्तेदाराच्या चुका
कैलास सोनवणे यांनी महासभेत कचºयाचा प्रश्नावर लक्षवेधी मांडली. यामध्ये मक्तेदाराकडून कराराप्रमाणे काम होत नसल्याचे त्यांनी मुद्दे मांडले. मात्र, मक्तेदाराला केवळ आठ दिवस झाले असल्याने त्यांना अजून संधी देण्याची मागणी केली. इतर भाजपा सदस्यांनी देखील त्यांना अनूमोदन देत भविष्यात मक्तेदाराकडून नियमांचा भंग झाल्यास कारवाईचा विचार केला जाईल अशाही सूचना उपमहापौर डॉ.अश्निन सोनवणे यांनी दिल्या.
बंटी जोशी यांची जाहीर माफी
नगरसेवक कैलास सोनवणे व भगत बालाणी यांच्यासोबत गेल्या महासभेत झालेल्या वादानंतर बंटी जोशी यांनी याबाबत आजच्या महासभेत सर्वांसमोर जाहीर माफी मागितली़
नितीन लढ्ढा हे लक्षवेधी मांडत असताना भाजपा सदस्य सचिन पाटील यांनी मध्येच हा मुद्दा आधी झालेला असताना त्यावर बोलू नये असे सांगितले. यावर शिवसेना सदस्य आक्रमक होवून महासभेत प्रत्येक सदस्याला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तरी भाजपा सदस्यांनी मध्ये बोलणे सुरु ठेवल्याने गोंधळ सुरु झाला.
भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांनी शिवसेनेचे अमर जैन व अनंत जोशी यांना तीव्र भाषेत खाली बसण्याचा सूचना दिल्याने जैन यांनी भाजपा गटनेत्यांना हा अधिकार नसल्याचे सांगितले. त्यावर बालाणी अधिक संतापल्याने वाद चिघळला. जैन आपली जागा सोडून थेट बालाणी यांच्यावर धावून गेले. त्यात भाजपा व शिवसेना सदस्यांनी ऐनवेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही सदस्यांमध्ये चांगलेच शाब्दिक वाद देखील झाले.
त्यातच नितीन लढ्ढा यांनी लक्षवेधी मांडत असताना महिलांचा अपमान केल्याचा आरोप भाजपा सदस्या सरिता नेरकर यांनी केला. तसेच याबाबत लढ्ढा यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र, लढ्ढा यांनी ही मागणी फेटाळून लावत महिलांचा कोणताही अपमान केला नसल्याचे सांगितले. त्यावर इतर भाजपा सदस्यांनी पडदा टाकत हा वाद शांत केला.

Web Title: Jalgaon Municipal Authority - On the question of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव