जळगाव मनपात भाजपच्या ऐतिहासिक विजयाची वर्षपूर्ती : वर्षभरानंतरही आव्हाने कायम ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:11 PM2019-08-03T12:11:14+5:302019-08-03T12:11:43+5:30

१०० कोटींचा निधी मंजूर ; काही प्रश्न ‘जैसे थे’

Jalgaon Municipal Corporation announces BJP's historic victory: challenges persist even after a year? | जळगाव मनपात भाजपच्या ऐतिहासिक विजयाची वर्षपूर्ती : वर्षभरानंतरही आव्हाने कायम ?

जळगाव मनपात भाजपच्या ऐतिहासिक विजयाची वर्षपूर्ती : वर्षभरानंतरही आव्हाने कायम ?

Next

जळगाव : गेल्यावर्षी ३ आॅगस्ट रोजीच मनपा निवडणुकीच्या निकालात भाजपचे पहिल्यांदाच ५७ नगरसेवक विजयी झाले होते. भाजपाने मनपात मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाची आज वर्षपूर्ती होत आहे. अजूनही बरीच आव्हाने सत्ताधाऱ्यांसमोर कायम आहेत. ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा मंजूर झाला असला तरी त्यातून कामांना मात्र सुरुवात झालेली नाही.
वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा दावा केला होता. शहराचा चेहरा-मोहरा जरी बदलला नसला तरी मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ३० कोटींच्या डीपीआरमधून ९ कोटींतून ८५ घंटागाड्या आणून शहरासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांचा सफाईचा मक्ता देण्यात आला आहे. अजून मक्तेदाराकडून कामाला सुरुवात झालेली नाही. भविष्यात शहराच्या साफ सफाईच्या कामांमध्ये नक्कीच फरक झालेला दिसून येईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापुर्वी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून कामांना सुरुवात झाली आहे. याच निधीतून साडे सात कोटी रुपयांचा एलईडीची योजना मात्र सपशेल फेल ठरली आहे. संबधित कंपनीने योग्य काम न केल्याने सत्ताधाऱ्यांवर हा मक्ता रद्द करण्याची नामुष्की ओढावलेली दिसून आली.
खड्डयांचा प्रश्न बिकट
शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. अमृत योजनेमुळे रस्ते पुर्णपणे खोदण्यात आले असून मनपाकडून केवळ थातुर-मातूर दुरुस्ती करण्यात आली.
गेल्या महिन्यात शहरातील उद्योजक अनिल बोरोले यांना या खड्डयांमुळे झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता. खड्डयांचा समस्येबाबत नागरिकांमध्ये सत्ताधारी व मनपा प्रशासनाबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे.
१०० कोटींचा निधी जाहीर कामांची मात्र प्रतीक्षा
गिरीश महाजन म्हणाले होते की, मनपात सत्ता आल्यानंतर शहरासाठी शासनाकडून २०० कोटींचा निधी आणू, त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे १६ आॅगस्ट २०१८ रोजी नगरोथ्थान अंतर्गत मनपासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, आता हा निधी मंजूर होवून देखील वर्ष झाले. वर्षभरात या निधीतून एकाही कामाला सुरुवात झाली नाही. यातील ४२ कोटी रुपयांचा कामांना शासनाने अंतिम मंजुरी दिली असून, या कामांसाठी लवकरच निविदा काढून कामांना सुरुवात करण्याचा मानस महापौरांनी व्यक्त केला आहे. तसेच या निधीतून ५८ कोटी रुपयांच्या निधीतील कामांना अजून प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे.
गाळे, हुडको प्रश्नांची गुंतागुंत कायम
जळगावच्या विकासाला अडसर असलेले हुडको कर्जाचा व मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने हे दोन्ही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र, दोन्ही ही प्रश्न वर्षभरात अधिकच किचकट होवून गेले आहेत. गाळेधारकांसाठी अधिनियमात बदल करण्याचे आश्वासन सत्ताधारी भाजपाने दिले होते. मात्र, वर्षभरात अधिनियमात जरी बदल केला तरी या बदलाचा जळगावच्या गाळेधारकांसाठी कोणताही फायदा झालेला नसून, आता गाळेधारकांनी सत्ताधाºयांना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर हुडको प्रकरणी देखील जानेवारी २०१९ मध्ये डिआरएटी मध्ये मनपाची याचिका फेटाळल्यानंतर २६ जून मनपाचे बॅँक खाते सील करण्यात आले होते. मुंबई उच्चन्यायालयाच्या आदेशानंतर दोन बॅँकाचे खाते उघडण्यात आले असले तरी मात्र अ‍ॅक्सीस बॅॅँकेचे खाते महिनाभरापासूनच बंदच आहे.
वर्षभरात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्यात आले असून, सफाईचा मक्ता देण्यात आल्याने जळगाव शहर एक स्वच्छ शहर म्हणून घडविण्याचा मानस आहे. शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यातून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पुढील वर्षभरात शहरात आणखीन बराच बदल झालेला पहायला मिळेल.
-सीमा भोळे, महापौर
नागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रयत्न आहे. वर्षभरात मोठा निधी शासनाकडून मनपासाठी आणण्यात यश मिळाले आहे. हुडको कर्जफेडीचा प्रश्न लवकरच सुटणार असून, गाळ्यांचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सकारात्मक आहेत. त्यामुळे वर्षभरात नागरिकांना तक्रारीची संधी राहणार नाही.
-सुरेश भोळे, आमदार

Web Title: Jalgaon Municipal Corporation announces BJP's historic victory: challenges persist even after a year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव