जळगावात मनपा निवडणुकीत शिवसेनेने दिली विद्यमान २२ नगरसेवकांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:06 PM2018-07-12T13:06:44+5:302018-07-12T13:08:09+5:30
समतोल साधला
जळगाव : शिवसेनेकडून बुधवारी आपल्या ७५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेनेच्या उमेदवारांची निवड करताना पक्ष नेतृत्वाने अनुभवी व युवा असा समतोल साधलेला दिसून येत असून विद्यमान २२ नगरसेवकांना संधी दिली आहे.
विद्यमान उपमहापौर, स्थायी समिती रिंगणाबाहेर
काही नगरसेवकांनी स्वत:हून उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या ऐवजी इतर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये विद्यमान उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती ज्योती इंगळे, अजय पाटील यांचा समावेश आहे. तर सायराबी अशोक सपकाळे ऐवजी त्यांच्या मुलाला शिवसेनेने संधी दिली आहे. तर काही नगरसेवकांचा पत्ता पक्षाने कट केला आहे. यामध्ये इकबाल पिरजादे, किशोर पाटील, संगिता राणे, राजू पटेल यांचा समावेश आहे.
मनसेतून आलेल्या दोन्ही नगरसेवकांना संधी
मनसेमधून शिवसेनेत आलेल्या लिना पवार व अनंत जोशी यांना शिवसेनेने संधी दिली आहे. त्या खेरीज भाजपातून आलेले नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनाही शिवसेनेने प्रभाग १४ ड मधून संधी दिली. तर राष्टÑवादीमधून शिवसेनेत दाखल झालेले अय्याज अली यांच्या पत्नी सिनीम अय्याज अली यांना शिवसेनेने संधी दिली.
शहराच्या विकासासाठी नेहमी उपलब्ध राहणार-रमेशदादा जैन
राजकारणात कोठे तरी थांबणे गरजेचे होते. त्यामुळे नवीन उमेदवारांना संधी मिळावी या हेतूने यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी महापौर रमेशदादा जैन यांनी दिली. मात्र, निवडणूक लढवित नसलो तरी युवा उमेदवारांना मार्गदर्शन करत राहणार असून, शहर विकासासाठी नेहमी उपलब्ध राहणार असल्याची माहिती रमेशदादा जैन यांनी दिली.