जळगाव महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:51 PM2018-05-29T22:51:37+5:302018-05-29T22:51:37+5:30
जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे : राष्ट्रवादीतर्फे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व विधानसभा क्षेत्र प्रमुखांची नियुक्ती
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२९ : आगामी काळात होणाऱ्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्ष असलेल्या काँग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी जिल्हा प्रभारी रंगनाथ काळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, माजी जि.प.सदस्य डी.के.पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, विकास पवार उपस्थित होते.
आगामी काळात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीतील रणनितीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगावातील नेत्यांसोबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नगरसेवकपदासाठी इच्छुक असणाºया उमेदवारांनी वॉर्डात आतापासून सक्रिय व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
आगामी काळात होत असलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत समविचारी पक्ष असलेल्या काँग्रेस सोबत आघाडी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांचा ज्या ठिकाणी प्रभाव आहे त्यानुसार जागा वाटपाचे सुत्र ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता, भाजपा केंद्रात व राज्यात सुडबुद्धीने वागत असल्याचे त्यांनी सांगितले. १०० नगरसेवक कारागृहात पाठविण्याचे गुपीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीच जाहिर करावे असेही त्यांनी सांगितले.