जळगाव मनपा निवडणूक : शहराच्या विकासासाठी भाजपासोबत युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:03 PM2018-06-30T13:03:13+5:302018-06-30T13:04:41+5:30

सुरेशदादा जैन यांची माहिती

Jalgaon Municipal Election: Alliance with BJP for the development of the city | जळगाव मनपा निवडणूक : शहराच्या विकासासाठी भाजपासोबत युती

जळगाव मनपा निवडणूक : शहराच्या विकासासाठी भाजपासोबत युती

Next
ठळक मुद्देगाळे व हुडको प्रश्न वर्षभरात मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन२ दिवसात जागा वाटप

जळगाव : शहराच्या विकासाला गती देण्यासाठी मनपा निवडणुकीत भाजपासोबत युती करण्याचा निर्णय खान्देश विकास आघाडीने घेतला आहे. लवकरच कुणी किती व कोणत्या जागा लढवायच्या याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
१ आॅगस्ट रोजी होवू घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी गुरुवारी बैठक झाली. त्या बैठकीत काय चर्चा झाली याबाबतची माहिती सुरेशदादा यांनी ७, शिवाजीनगर या त्यांच्या निवासस्थानी दिली. यावेळी माजी महापौर नितीन लढ्ढा उपस्थित होते.
शहराच्या विकासाची गाडी रुळावर आणू
सुरेशदादा म्हणाले, मनपा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तयारी सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी दिले सुरेशदादा यांना अधिकार
मनपा निवडणुकीविषयी भूमिका निश्चित करण्याबाबत शुक्रवारी दुपारी २ वाजता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार आर.ओ.तात्यापाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महानगराध्यक्ष गणेश सोनवणे, कुलभुषण पाटील, शोभा चौधरी आदी उपस्थित होते.
या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे मनपा निवडणुकीविषयी माहिती दिली. तसेच काही पदाधिकाºयांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची मागणी केली. त्यावर उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्याचा अधिकार सुरेशदादा जैन यांना दिला आहे.
खाविआ की शिवसेना या निर्णयाबाबत सुरेशदादाच निर्णय घेणार असून, यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे रविवारी सुरेशदादांची भेट घेणार असल्याचे उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाºयांना सांगितले. खाविआकडून निवडणूक लढल्यास काही जागा शिवसेनेसाठी सोडाव्यात अशी मागणीही काही पदाधिकाºयांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे केली, अशी माहिती मिळाली.
महापौरपदासाठी आग्रह; जागा वाटप महत्वाचे
भाजपाने महापौरपदाचा आग्रह केला असला तरी खाविआचा देखील महापौरपदासाठी आग्रही आहे.यासाठी काही पर्याय निवडणुकीनंतर निश्चित केले जातील. सव्वा-सव्वा वर्षांचा पर्याय देखील आमच्यासमोर आहे. तसेच पहिले वर्ष महापौरपद मिळावे असाही आग्रह देखील आहे. मात्र, महापौराबाबत अजून विचार नसून आधी जागावाटपाबाबत निर्णय महत्वाचा आहे. गिरीश महाजन हे भाजपाच्या पदाधिकाºयांशी चर्चाकरणार आहेत. त्यानंतर गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात जागावाटपाबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सुरेशदादा यांनी दिली.
खाविआ व शिवसेना दोन्ही पर्याय
पत्रकारांशी बोलताना सुरेशदादा म्हणाले, गुरुवारी मुंबईला मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन मनपा निवडणुकीत भाजपाशी युती करण्याबाबत माहिती त्यांना दिली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेचे चिन्ह लोकांपर्यंत पोहचावे यासाठी शिवसेनेचा विचार करावा अशा सूचना उध्दव ठाकरे यांनी दिल्या. खाविआ की शिवसेना असे दोन्ही पर्याय आमच्याकडे असून शिवसेनेच्या चिन्हावर लढविण्यास अडचण नाही. शिवसेनेच्या काही पदाधिकाºयांनी मुंबईत शुक्रवारी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. सर्व पदाधिकारी आल्यानंतर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही सुरेशदादांनी सांगितले.

Web Title: Jalgaon Municipal Election: Alliance with BJP for the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.