जळगाव मनपा निवडणूक : शिवसेनेच्या पुरस्कृत विरुद्ध अधिकृत उमेदवारामध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:52 PM2018-07-22T12:52:19+5:302018-07-22T12:53:12+5:30
प्रभाग ७ ड व प्रभाग २ ब मध्ये रंगणार लढत
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेने ७ अपक्षांना पाठिंबा देत पुरस्कृत केले आहे. त्यात प्रभाग क्रमांक ७ ड व प्रभाग २ ब मध्ये शिवसेनेचे दोन अधिकृत उमेदवार असताना, माघारीची मुदत संपल्यानंतर दोन अपक्ष उमेदवारांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. मात्र, या प्रभागातील अधिकृत उमेदवारांनी जाहीर माघार घेण्यास नकार दिल्यामुळे आता शिवसेना पुरस्कृत व अधिकृत अशी लढत रंगणार आहे.
शिवसेनेने सुरुवातीला ७५ जागांवर आपले अधिकृत उमेदवार उभे केले होते. मात्र, छाननी दरम्यान लिना पवार, गणेश सोनवणे, जिजाबाई भापसे यांच्या एबी फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास राज्य निवडणूक आयोगाने नकार दिला. तसेच लिना पवार यांचा प्रभाग ११ क मधील पक्षासह अपक्ष उमेदवार भरलेला अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांनी प्रभाग ११ ब मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली.
ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे प्रभाग ११ मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार हर्षाली वराडे यांना ऐनवेळी माघार घेण्याचा सूचना पक्षाने दिल्यानंतर त्यांनी लागलीच पक्षादेश मानत माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेने प्रभाग ११ ब मधून लिना पवार तर ११ क मधून अनिता सोनवणे या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले. तर १७ ड मधून शिवसेनेचे गजानन देशमुख यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागेवर हर्षल मावळे यांना पक्षाने पुरस्कृत केले आहे.
अक्षय सोनवणे व योगेश पाटील रिंगणात
खाविआच्या नगरसेविका हर्षा सांगोरे यांचे पती अमोल सांगोरे यांनी प्रभाग २ ब मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. तर भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान नगरसेविका जयश्री पाटील यांनी प्रभाग ७ ड मधून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
माघारी आधीच या दोन्ही उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या दोन्ही प्रभागातील अधिकृत उमेदवार अक्षय सोनवणे व योगेश पाटील यांना माघार घेण्याचे आदेश दिले. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी पक्षादेश नाकारत पक्षाच्या चिन्हावरुन प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे प्रभाग २ ब मध्ये शिवसेना पुरस्कृत अमोल सांगारे व अधिकृत अक्षय सोनवणे तर प्रभाग ७ ड मध्ये शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार जयश्री पाटील व योगेश पाटील यांच्यात लढत रंगणार आहे.
योगेश पाटील यांच्या पॅम्प्लेटवर सुरेशदादांचे छायाचित्र नाही
प्रभाग ७ ड मधील उमेदवार योगेश पाटील यांनी शिवसेनेच्या चिन्हावरच प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी मतदारांना वितरीत करण्यासाठीच्या पॅम्प्लेटवर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेचे जिल्हा संघटक हभप ज्ञानेश्वर जळकेकर यांचे छायाचित्र आहे मात्र माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे छायाचित्र नाही. तर अक्षय सोनवणे यांनी देखील शिवसेनेच्या चिन्हावरच प्रचाराला सुरुवात केली आहे.