जळगाव मनपा निवडणूक : खान्देश विकास आघाडी व भाजपाच्या युतीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:56 PM2018-06-29T12:56:34+5:302018-06-29T12:57:17+5:30
मुंबईत झाली बैठक
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी खान्देश विकास आघाडी व भाजपा यांच्यातील युतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली.
महानगरपालिकेत शहराच्या विकासाच्या मुद्यावर भाजपा व खान्देश विकास आघाडीमध्ये युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सुरेशदादा जैन हे दोन्हीही इच्छुक होते.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांपूर्वीच सुरेशदादांसोबत झालेल्या चर्चेत युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच गुरुवारी सकाळी ८.३० वाजता सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंदूलाल पटेल व मनपा सभागृह नेते नितीन लढ्ढा हे देखील उपस्थित होते.
विमान दुर्घटनेमुळे सायंकाळची बैठक रद्द
सकाळी मुख्यमंत्री व सुरेशदादा जैन यांची २० मिनीटे बैठक झाल्यानंतर सायंकाळी देखील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार होती. मात्र, दुपारी घाटकोपर येथे झालेल्या विमान दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी होणारी बैठक रद्द केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जागावाटपाचा निर्णय सुरेशदादा व महाजन घेणार
मुख्यमंत्र्यांनी खाविआ व भाजपाच्या युतीबाबत सकारात्मक चर्चा केल्यानंतर जागावाटपाचा निर्णय हा सुरेशदादा जैन व गिरीश महाजन यांनीच स्थानिक पातळीवर चर्चा करून घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या मुदतीपूर्वीच जागावाटपाबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.
युतीबाबत ‘वर्षा’वर २० मिनीटे सविस्तर चर्चा
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गिरीश महाजन व सुरेशदादा जैन यांची मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी रात्रीच बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्र्याची तब्येत बरी नसल्याने ही बैठक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजता ही बैठक घेण्याचे निश्चित झाले. गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरेशदादा जैन, गिरीश महाजन, चंदूलाल पटेल व नितीन लढ्ढा हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर पोहचले. सकाळी ८.३० वाजता बैठकीला सुरुवात झाली. सुमारे २० मिनीटे चाललेल्या या बैठकीत युतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक होते.
सुरेशदादांनी उध्दव ठाकरे यांचीही घेतली भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सुरेशदादा जैन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सकाळी ११.३० वाजता ‘मातोश्री’वर भेट घेतली. या बैठकीत मनपा निवडणूक तसेच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेबाबतची माहिती सुरेशदादा यांनी उध्दव ठाकरे यांना दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये मात्र नाराजी
मुंबईत युतीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार चंदुलाल पटेल हे उपस्थित होते. मात्र, या बैठकीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार सुरेश भोळे यांना डावलल्यामुळे भाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये नाराजी होती.