जळगाव मनपा निवडणूक : एकनाथराव खडसे यांच्या आवाजात प्रचाराची बनावट क्लीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:46 PM2018-07-30T12:46:49+5:302018-07-30T12:47:30+5:30
धक्कादायक प्रकार
जळगाव : भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या आवाजातील भाजपाच्या प्रचाराची एक आॅडीओ क्लीप मोबाईलवर ऐकवली जात आहे. मात्र ही क्लीप बनावट असल्याचे स्वत: खडसे यांनी स्पष्ट केले आहे. गत आठवड्यातही आमदार सुरेश भोळे यांचे बनावट लेटहेड वापरुन खडसेंविरुद्ध उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
आमदाराचे लेटरहेड वापरुनही केली होती तक्रार
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तक्रारीसाठी आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वीच पुढे आला होता. याबाबत आमदार भोळे यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन खडसे यांची बदनामी करणारे बनावटपत्र पाठविणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती.
दानवे यांच्यासमोरही मांडला खडसेंवरील अन्यायाचा प्रकार
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शनिवारी जळगावात आले असता खडसे समर्थकांनी पक्षाकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायकारक व अपमानास्पद वागणुकीबद्दल तक्रारीचा पाढा वाचला होता. स्वत: खडसे यांंनीही आपल्यावरील अन्याय दूर होईल, ती वेळ कधी येणार नाही, असे मत व्यक्त करत नाराजी दर्शविली होती.
अशा स्थितीत खडसे यांंना अडचणीत टाकणारी वेगवेगळी प्रकरणे पुढे येत आहेत. यापूर्वी बनावट डीडी तयार करून हायकोर्टात पुराव्या दाखल सादर केल्याबद्दल खडसे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह बॅँक अधिकाºयांविरुध्द गेल्याच महिन्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता आमदारांच्या लेटरहेडवरील बनावट तक्रारीचे प्रकरण ताजे असताना बनावट आॅडिओ क्लीपचे प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा आहे.
खडसेंच्या मोबाईलवर आली क्लीप
ही क्लीप खडसे यांच्या मोबाईलवर त्यांना स्वत: ला ऐकण्यास मिळाली. मात्र त्यांनी अशी कोणतीही क्लीप केलेली नसल्याने बनावट आवाज कोणीतरी ही क्लीप तयार केल्याने एकप्रकारे आपली फसवणूकच झाल्याचे खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझ्या आवाजातील अशी बनावट क्लीप परस्पर वापरली जात असेल तर माझ्यावर अप्रत्यक्षरित्या अविश्वास दाखविण्याचा हा प्रकार आहे, असेही खडसे म्हणाले.
आधीच त्रास, त्यात पुन्हा क्लीप
पक्षाने आदेश दिले असते तर मी आनंदाने क्लीप बनविण्यासाठी तयार झालो असतो. परंतु मागे माझ्या नावाने बनावट चेक प्रकरणात मी त्रास भोगत असताना अशा प्रकारे माझ्या आवाजात आज ही क्लीप केली समोर आली. उद्या इतर कोणतीही क्लीप माझ्या आवाजात तयार होवू शकते, असेही खडसे यांनी म्हटले आहे.