जळगाव मनपा निवडणूक : ‘सोशल मीडिया’वर माघारीची कारणमीमांसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:43 AM2018-07-18T11:43:56+5:302018-07-18T11:44:48+5:30
प्रचारासंदर्भात विविध पोस्ट
जळगाव : मनपा निवडणुकीसंदर्भात सध्या सोशल मीडियावरही वेगवेगळी चर्चा रंगत असून आता माघार घेतलेल्या उमेदवारांनी का माघार घेतली याबाबतही वेगवेगळे संदेश फिरत आहेत. सोबतच इतरही संदेश आवर्जून वाचले जात असून उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचारासंदर्भात विविध पोस्ट सोशल मीडियावर टाकून ‘डिजिटल’ प्रचार करीत आहेत.
मनपा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरू लागले. मंगळवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने यात १२४ उमेदवारांनी माघार घेतली. यात माघार घेण्याबाबत चर्चा होऊ लागली आहे.
विनंतीला मान
माघार घेणाऱ्या उमेदवाराने भाऊ, दादा, ताई, नाना, अण्णा यांनी विनंती केल्याने माघार घेतली असल्याचे संदेश दुपारपासून फिरू लागले. यात या मंडळींचा शब्द आपण मान्य केला असून समाजासाठी त्याग केल्याचा उल्लेखही सोशल मीडियावर होत आहे.
फक्त खर्च काढून द्या
माघार घेत असताना निवडणूक अर्ज, डिपॉझिट व कार्यकर्त्यांचा झालेला खर्च काढून द्या असे माघार घेणाºयांचे म्हणणे असल्याच्या पोस्ट चर्चेच्या ठरत आहे.
डिजिटल पद्धतीने प्रचार
उमेदवारी स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांनी आपापले बॅनर असलेल्या पोस्टही सोशल मीडियावर टाकून एक प्रकारे डिजिटल प्रचार करीत जास्तीत जास्त शहरवासीयांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या सोबतच प्रभागात विकासावर भर राहण्यासह वेगवेगळे आश्वासने असलेल्या पोस्ट ‘नेटीझन्स’काढून आवर्जून वाचल्या जात आहेत. शहरात तरुण उमेदवारांची गरज का आहे, हेदेखील सोशल मीडियावरून पटवून दिले जात आहे.