जळगाव मनपा निवडणूक : बारा ठिकाणी शिवसेना आणि भाजपामध्ये सरळ लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:24 PM2018-07-18T12:24:50+5:302018-07-18T12:26:32+5:30
माघारीनंतर झाले लढतींचे चित्र स्पष्ट
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर सर्व लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. १२ ठिकाणी शिवसेना व भाजपा उमेदवारांमध्ये आमने-सामने लढत होणार असून, काही ठिकाणी तिरंगी तर काही प्रभागात चौरंगी लढत रंगणार आहेत.
१२४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच सर्व ७५ जागांवर भाजपाने उमेदवार उभे केले आहेत. तर शिवसेनेने ७० ठिकाणी उमेदवार दिले असून, पाच ठिकाणी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवारांना पाठींबा देण्यात आला आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसकडून ४२, कॉँग्रेसकडून १६, एमआयएम व समाजवादी पक्षाचे प्रत्येकी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छाननीत वैध ठरलेल्या २०१ अपक्ष उमेदवारांपैकी ११९ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ८२ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
शिवसेना व भाजपात काट्याची लढत
या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेमध्येच काट्याची लढत रंगणार असून, बारा ठिकाणी आमने सामने लढत होणार आहे. यामध्ये प्रभाग १ ब मध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका संगीता दांडेकर व भाजपाच्या सरीता नेरकर यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग ४ क मध्ये भाजपच्या चेतना चौधरी व शिवसेनेच्या सैय्यद सिनत अयाजअली यांच्यात लढत आहे. प्रभाग १३ ब मध्ये भाजपच्या ज्योती चव्हाण व शिवसेनेकडून दिपीका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभाग १२ मध्ये ३ लढती समोरासमोर
प्रभाग १२ ब, क व ड मधील तिन्ही लढती या शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांमध्ये होणार आहेत. प्रभाग १२ ब मध्ये भाजपच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे यांच्या समोर शिवसेनेच्या पुष्पा पाटील यांची लढत आहे. प्रभाग १२ क मध्ये शिवसेनेच्या मंदाकिनी जंगले यांच्या समोर भाजपच्या गायत्री राणे यांचे आव्हान आहे. १२ ड मध्ये शिवसेनेचे अनंत जोशी व भाजपचे जीवन अत्तरदे यांच्यात लढत आहे.
भारती सोनवणे व जयश्री धांडे, सुनील खडके व प्रकाश बेदमुथा यांच्या लढतीकडे लक्ष
प्रभाग ४ ब व प्रभाग १७ क मध्ये तगडी लढत रंगणार आहे. प्रभाग ४ ब मध्ये भाजपने माजी उपमहापौर भारती सोनवणे यांना मैदानात उतरविले आहे.त्यांच्या विरोधात शिवसेनेने माजी महापौर जयश्री धांडे यांना मैदानात उतरविले आहे. त्याचप्रमाणे १७ क मध्ये देखील भाजपचे मनपा विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांचे पूत्र सुनील खडके हे भाजपाकडून तर शिवसेनेकडून प्रकाश बेदमुथा हे दोघं आमने-सामने लढत आहेत.
आमदार पत्नींचीही सरळ लढत
भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या प्रभाग ७ अ मध्ये रिंगणात असून त्यांची लढत शिवसेनेच्या साधना श्रीश्रीमाळ यांच्याशी होणार आहे. तर शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे यांचीही प्रभाग १९ अ मध्ये थेट लढत असून, त्यांच्यासमोर भाजपच्या तडवी शरिफा रहेमान यांचे आव्हान आहे.