एकाग्रता, शिस्त व अचूक लयबद्धतेने राष्ट्रीय पातळीवर जळगावचा डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:01+5:302021-02-11T04:18:01+5:30

समृद्धी संतच्या गुणांचे प्रशिक्षकांकडून कौतुक : संरक्षण क्षेत्रात काम करून देशसेवेचा मनोदय जळगाव : राजपथावर संचलन व त्यात संपूर्ण ...

Jalgaon at the national level with concentration, discipline and precise rhythm | एकाग्रता, शिस्त व अचूक लयबद्धतेने राष्ट्रीय पातळीवर जळगावचा डंका

एकाग्रता, शिस्त व अचूक लयबद्धतेने राष्ट्रीय पातळीवर जळगावचा डंका

Next

समृद्धी संतच्या गुणांचे प्रशिक्षकांकडून कौतुक : संरक्षण क्षेत्रात काम करून देशसेवेचा मनोदय

जळगाव : राजपथावर संचलन व त्यात संपूर्ण परेडचे नेतृत्व हे जसे अभिमानास्पद आहे, तेवढेच ते आव्हानात्मकदेखील असल्याने त्यासाठी एकाग्रता, शिस्त व अचूक लयबद्धता हे सर्व गुण आवश्यक असतात. याच बळावर एनसीसीचा विद्यार्थी पुढे जातो व हे सर्व गुण जळगावच्या समृद्धी संतने जोपासले व प्रजासत्ताक दिनी परेड कमांडर म्हणून तिला संधी मिळाली. यामुळे जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले, असे गौरोद्वार ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणाऱ्या मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संतच्या प्रशिक्षकांनी काढले.

७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील राजपथावर झालेल्या संचलनात ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणारी समृद्धी संत हिच्या यशोगाथेविषयी संवाद साधण्यासाठी समृद्धी, तिचे आई-वडील, प्रशिक्षक यांचे चर्चासत्र लोकमत कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तिच्या शालेय जीवनातील कवायतीपासून ते राजपथापर्यंतच्या प्रवासाची माहिती देत तिच्या यशाबद्दल प्रशिक्षकांनी कौतुक केले.

या वेळी समृद्धीसह सुभेदार अजित सिंग, कंपनी हवालदार मेजर नारायण पाटील, एनसीसी बटालियनचे समादेशक अधिकारी गोविंद पवार, ज्योती मोरे, समृद्धीचे वडील हर्षल संत, आई अर्चना संत उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

शालेय जीवनापासून होते संचलनाचे निरीक्षण

एनसीसीमध्ये विविध टप्प्यांवर कवायतीचे योग्य पाऊल आवश्यक असते. यात शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या संचलनाचे निरीक्षण केले जाते. शालेय, महाविद्यालयीन प्रशिक्षण व पीटी स्पर्धा या सर्व टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून होणारी कवायत पाहून त्याला कॅम्पसाठी पाठविले जाते. ज्याची कवायत (ड्रिल) शिस्तबद्ध व लयबद्ध असते तसेच कोणत्या पावलावर सॅल्यूट करायचा, कोठे वळायचे, काय करायचे आहे, याविषयी योग्य वेळी सूचना दिली जाते त्याचीच यासाठी निवड होते. समृद्धीने या सर्वांमध्ये सुरुवातीपासून एकाग्रता ठेवली व राजपथापर्यंत पोहचू शकली, असे सुभेदार अजित सिंग यांनी सांगितले.

स्वप्नपूर्तीने अनोखा आनंद

आपली मुलगी राजपथावर संचलनाचे नेतृत्व करीत आहे, हा क्षण पाहून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, असे हर्षल संत व अर्चना संत यांनी आपल्या मुलीचे कौतुक करताना सांगितले. समृद्धीची स्वप्नपूर्ती तिच्या मेहतीने, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे व ज‌ळगावकरांच्या प्रेमामुळे होऊ शकली, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाची भीती, मात्र निर्णय सार्थकी

राजपथावर संचलन करणे हे समृद्धीचे स्वप्त होते व त्यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न करीत होती. यंदा तर तिला अखेरची संधी होती. मात्र कोरोना संसर्गाची भीती असल्याने तिला पाठवावे की नाही, अशीही चिंता होती. मात्र समृद्धीने आग्रह केला व तिला आम्ही पाठविले, हा निर्णय खरेच सार्थकी ठरला असे हर्षल व अर्चना संत यांनी सांगितले.

देशभरातील युनिटमधून समृद्धीची निवड

राजपथावरील संचलनासाठी ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून देशभरातील एनसीसी युनिटमधून एका विद्यार्थ्याची निवड होते. कमांडर म्हणून नेतृत्व करीत असताना एक जरी पाऊल मागे-पुढे झाले की संपूर्ण परेड विस्कळते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची अचूक परेड पाहून त्याची यासाठी निवड केली जाते. यंदा देशभरातून आलेल्या १७ युनिटमधूून समृद्धी या पदापर्यंत पोहचू शकली. निवड होत असताना अंतिम दोन टप्प्यात पाच मुली होत्या. त्यांची १९ व २० जानेवारी रोजी निवड चाचणी झाली. त्यातून उत्तराखंड, गुजरात व जळगावची समृद्धी या तिघींची अंतिम टप्प्यासाठी निवड झाली. तिघींमध्ये समृद्धीची परेड पाहून ती परेड कमांडर म्हणून निवडली गेली. २३ जानेवारी रोजी आपली निवड झाल्याचे समजले व थोडा दबाव वाढला, असे समृद्धीने सांगितले.

सर्वप्रथम कमांडरांनी केले कौतुक, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची भेट

राजपथावर संचलनाचे नेतृत्व करायचे आहे, हे समजले त्या वेळी आपली आता जबाबदारी वाढली आहे, मात्र ‘जोशमध्ये होश’ सुटायला नको असा विचार करीत यशाचा टप्पा गाठला. संचलन नेतृत्व यशस्वी झाल्यानंतर सर्वप्रथम राजपथावर कमांडरांनी कौतुक केल्याचे समृद्धीने सांगितले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व त्यांनी शाबासकी दिल्याचे तिने सांगितले. मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आदींची भेट घेतली.

संरक्षण क्षेत्रात काम करणार

भविष्यात आपल्याला संरक्षण क्षेत्रात काम करायचे असल्याचे समृद्धीने सांगितले. जेव्हापासून एनसीसीचे प्रशिक्षण घेत आहे, तेव्हापासून वैयक्तिक आयुष्यात मोठे बदल झाले. वागणे, बोलणे, दृष्टिकोन बदलला. शिस्त लागली व स्वत:चे काम स्वत: करायले शिकले, असेही तिने सांगितले.

जळगावात समृद्धीला हवालदार हेमा राम, सुभेदार जय पॉल, सुभेदार सतीश कुमार, नायक सुभेदार किरण माने यांचे मार्गदर्शन लाभल्याचे समृद्धीने सांगितले.

Web Title: Jalgaon at the national level with concentration, discipline and precise rhythm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.