पंचनाम्यात विहीरच बदलली, विरोधकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:22 AM2018-06-16T06:22:00+5:302018-06-16T06:22:00+5:30
विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
जळगाव - विहीरीत पोहले, एवढ्याशा शुल्लक कारणावरून वाकडी (ता. जामनेर) येथील मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पंचनामा करताना पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विहीरीत पोहल्याच्या कारणावरुन संबंधित विहिरीचा मालक ईश्वर जोशी व नोकर प्रल्हाद लोहार यांनी मातंग समाजातील दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढली. रविवारी घडलेल्या या आमानुष घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची वाच्यता फुटली. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
पुरोगामी महाराष्टÑात घडलेल्या या घटनेबद्दल अनेकांनी संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. तक्रार मागे घ्यावी म्हणून या घटनेतील पीडितांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी जलद न्यायालयात होणे आवश्यक असून त्यामुळे जनतेत योग्य संदेश जाईल, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी अनेक संघटनांचे पदाधिकारी वाकडी गावाला भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेतली. तपास यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांकडून दबाव येत असून पंचनाम्यात पोलिसांनी घटनेतील विहिरीच बदलविल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला
आहे.
सत्तार व ग्रामस्थांमध्ये वाद
घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे एक पथक शुक्रवारी वाकडी येथे आले होते. या घटनेला राजकीय स्वरुप दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे काही वेळ सत्तार व गावकºयांमध्ये वाद- विवाद झाला. यानंतर आमदार सत्तार यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेऊन, घटनेचा तपास निष्पक्षपणे करावा, अशी मागणी केली. यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री व जामनेर मतदार संघाचे आमदार गिरीश महाजन यांनीही या गावाला भेट देऊन विहिरीची पाहणी केली.
प्रसारमाध्यमांवर रोष : वाकडी येथे कोणताही जातीय संघर्ष, तणाव नसतांना प्रसार माध्यमांनी अतिरंजीत वृत्त दिल्याचा आरोप वाकडीच्या ग्रामस्थांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर केला. त्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व ग्रामस्थांमध्ये काही क्षण वाद झाला.
वाकडीत घडलेली घटना दुर्देवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली असून, कुणाचीही गय केली जाणार नाही; मात्र या घटनेचे कुणी राजकारण करू नये. वाकडी गावात सर्व जाती-धर्माचे लोकसंख्याने राहतात. शांततेचा भंग होईल, असा प्रयत्न कुणी करू नये.
-गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
गोरगरीब, दलित, मागासवर्गीयांवर दबावाचे राजकारण करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. वाकडीच्या घटनेत पीडितांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही.
- अब्दुल सत्तार, आमदार, सिल्लोड