CoronaVirus News : कोरोनात एकीने पती तर दुसऱ्याने पत्नी गमावली; अखेर 'त्यांनी' साताजन्माची लग्नगाठ बांधली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:03 PM2022-05-30T13:03:07+5:302022-05-30T14:32:23+5:30
जुन्या रुढी, परंपरा बाजुला सारत समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्यालाही वैयक्तिक आयुष्य आहे, जगण्याचा अधिकार आहे या उदात्त भावनेने कुटूंब, नातेवाईक व वहिणी यांची समजूत घातली अन् दुसरा विवाह घडवून आणला.
सुनील पाटील
जळगाव - संसार अतिशय सुखात सुरू असतानाच त्याला कोरोनाची दृष्ट लागली. त्यात सुमित्रा यांचा पती तर ऋषीकेश यांची पत्नी हिरावली. त्यामुळे दोघांच्या संसारातले एक चाक निखळले. दोघांनाही मुलं आहेत. स्वत:सह मुलांचे आयुष्य व भवितव्याचा प्रश्न होताच, मात्र समाज दुसऱ्या लग्नाला मान्यता देणार नाही, किंबहूना सुमित्रा यांचीही विवाहाची इच्छा नव्हतीच. मात्र सुमित्रा यांचा दीर नितीन हिरालाल पाटील यांनी पुढाकार घेत जुन्या रुढी, परंपरा बाजुला सारत समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्यालाही वैयक्तिक आयुष्य आहे, जगण्याचा अधिकार आहे या उदात्त भावनेने कुटूंब, नातेवाईक व वहिणी यांची समजूत घातली अन् दुसरा विवाह घडवून आणला.
शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे मुळ गाव तर सामनेर, ता.पाचोरा मामाचे गाव असलेल्या नितीन पाटील यांचे मोठे बंधू विनोद पाटील यांचे कोरोनात निधन झाले. पतीच्या निधनाने पाच वर्षाची मुलगी व सुमित्रा (माहेर मामलदे, ता.चोपडा) यांच्यावर मोठे संकट कोसळले. पुढील आयुष्य कसे जगायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा होता. अशातच कनाशी, ता.भडगाव येथील ऋषीकेश यांच्या पत्नी शिक्षिका अनघा यांचेही कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती नितीन यांना समजली. त्यांनी ऋषीकेश व त्यांच्या नातलगांशी संपर्क केला. त्यांना २२ वर्षाचा मुलगा आहे. इकडे वहिनी व कुटूंबाची समजूत घातली.
जुन्या रुढी, परंपरांना छेद देत दोन्ही परिवार राजी झाले. ऋषीकेश यांनी पाच वर्षाच्या मुलीसह सुमित्रा यांचा स्वीकार करण्यास होकार दिला अन् दोन्ही परिवाराच्या संमतीने २७ मे रोजी अंबरनाथ येथे हा पुनर्विवाह पार पडला. दोन्ही पाटील कुटूंबात आज आनंदाचे वातावरण आहे. या विवाह सोहळ्यास जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील नातेवाईक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.