पीरबाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून परतताना मामा ठार, भाचा जखमी
By विलास.बारी | Published: August 6, 2022 11:56 PM2022-08-06T23:56:13+5:302022-08-06T23:56:49+5:30
ओव्हरटेक करताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला कट लागल्याने अपघात
विलास बारी / जळगाव: मोहरम निमित्त रांजणगाव, ता. चाळीसगाव येथे पीरबाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून परत येत असताना ओव्हरटेक करताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला कट लागल्याने मंगल ऊर्फ पिंटू माणिक सोनवणे (वय ४०, रा. डोमगाव, ता. जळगाव) हे जागीच ठार तर त्याचा भाचा सुरेश रतन भील (वय २४ ) रा. डोमगाव, ता.जळगाव हा जखमी झाला. हा अपघात शनिवारी रात्री पावणे दहा वाजता हडसन, ता. पाचोरा गावाजवळ झाला.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील पीरबाबाच्या दर्ग्यावर चादर चढविण्याचा नवस मंगल सोनवणे याने केला होता. त्यासाठी शनिवारी दुपारी भाचा सुरेश याला घेऊन तो दुचाकीने गेला होता. तेथून परत येत असताना पाचोरा तालुक्यातील हडसन गावाजवळ अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला कट मारला. त्यात दोघेजण दुचाकीवरून फेकले गेले. मंगल यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुरेश हा जखमी झाला आहे. गावकऱ्यांनी दोघांना तातडीने पाचोरा रुग्णालयात दाखल केले असता मंगल यांना मयत घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. या घटनेबाबत डोमगाव गावात शोककळा पसरली आहे.