Jalgaon: होत्याचे नव्हते झाले, पंधरा दिवसांपुर्वी पाहिलेल्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा, कृषी विभागाकडून पंचनामे सुरु
By Ajay.patil | Published: March 14, 2023 06:26 PM2023-03-14T18:26:37+5:302023-03-14T18:27:02+5:30
Jalgaon : खरीपाच्या कटू आठवणी विसरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली होती. अगदी पंधरादिवसांपर्यंत शेतातील डोलणारी पीकं पाहून बळीराजाने खरीप हंगामाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
- अजय पाटील
जळगाव - खरीपाच्या कटू आठवणी विसरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली होती. अगदी पंधरादिवसांपर्यंत शेतातील डोलणारी पीकं पाहून बळीराजाने खरीप हंगामाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर मंगळवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले असून, पंधरा दिवसांपुर्वी पाहिलेल्या स्वप्नांचा अक्षरश चुराळा झाला आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील यावल, चोपडा, धरणगाव, जळगाव, अमळनेर या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या गहू, हरभरा, मका व ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. कृषी विभागाकडून अद्याप कोणताही आकडा समोर आला नसला तरी झालेल्या नुकसानीची आकडेवारी मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी यंदा उशीराने पेरणी केली होती, अशा शेतकऱ्यांचा माल अद्यापही शेतांमध्येच आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
संकट वाढणार, आगामी दोन गारपीटीचा अंदाज
मंगळवारी जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. मात्र, सुदैवाने वारा नसल्यामुळे केळीचे नुकसान झाले नाही. दरम्यान, शेतकऱ्यांवरील संकट आणखीन दोन दिवस वाढणार आहे. कारण, भारतीय हवामान खात्याकडून आगामी दोन दिवस जिल्ह्यात वादळी पावसासह आता गारपीटीचाही अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात ज्वारी, दादर, बाजरी व मका मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढला जात असतो. त्यामुळे सध्यस्थितीत मका, दादर शेतातच आहे. एकीकडे दादरला चांगला भाव असताना गारपीटीचा अंदाज असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
मार्च महिना शेतकऱ्यांसाठी ठरतोय धोकेदायक
गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक हवामानात होत असलेल्या बदलामुळे जिल्ह्यातील वातावरणात देखील मोठा बदल होत आहे. गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास पाहिला तर मार्च महिना हा शेतकऱ्यांसाठी धोकेदायक ठरत आहे. यंदा मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ९ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड जर नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली तर अवकाळीमुळे होणारे नुकसान टाळता येवू शकते.