कोरोना लसीकरणाचा जळगाव पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:45+5:302021-05-22T04:15:45+5:30
गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जिल्ह्यात चांगलाच जाणवत आहे. या आठवड्यात तर दोन दिवस लसीकरण पूर्ण बंद होते. हा ...
गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जिल्ह्यात चांगलाच जाणवत आहे. या आठवड्यात तर दोन दिवस लसीकरण पूर्ण बंद होते. हा विषय जरी सगळीकडे गाजत असला तरी लसीकरणात जळगावच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेली कामगिरी नक्कीच कुणालाही नजरेआड करता येणार नाही. राज्यात आणि देशात सगळीकडे लस वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे; मात्र जळगाव जिल्ह्यात लस वाया जाऊ न देता आलेल्या लसींच्या डोसपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याआधी असा प्रकार केरळमध्ये समोर आला होता. तेथील उच्च प्रशिक्षित नर्सेसनी आलेल्या डोसपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले होते. कोविशिल्डच्या एका व्हायलमध्ये सहा मिली लस येते. तर एका रुग्णाला ०.५ मिली एवढीच लस द्यायची असते. ही व्हायल दहा जणांचा डोस होईल, अशा उद्देशाने पाठवली जाते. त्यातील औषधाचा काही भाग हा वाया जाईल, या हेतूने जास्त दिलेला असतो; मात्र जळगाव जिल्ह्यातील नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन केले आणि लसींचा डोस जवळपास २० हजार जणांना जास्त दिला. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर प्रथमच एका आठवड्यात सलग दोन दिवस लसीकरण बंद होते. राज्यातही लसींचा तुटवडा आहे. जिल्हा प्रशासनाला मिळणाऱ्या लसींमधून नागरिकांना लस पुरवताना मोठी कसरत होत आहे. दररोज लस मिळण्यासाठी नागरिक रांगा लावून उभे राहत आहेत. तर येणारी लस कमी आहे. त्यामुळे लसीकरणाला मोठी खीळ बसली आहे.