जळगाव पोलीस दलाची बदनामीच थांबेना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 10:49 AM2019-01-19T10:49:52+5:302019-01-19T10:54:41+5:30
महिलांची छेडखानी असो की बलात्कार या सारख्या प्रकरणांनी २०१८ या वर्षात पोलीस दलाची बदनामी झाली. त्यानंतर आता नवीन २०१९ या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पोलीस दलाची बदनामी सुरु झाली, ती लाचखोरीवरुन. दोनशे रुपयाची लाच दिली नाही म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसाने सुरतच्या ट्रक चालकाचे डोके फोडल्याचा प्रकार या आठवड्यात घडला.
सुनील पाटील
जळगाव : महिलांची छेडखानी असो की बलात्कार या सारख्या प्रकरणांनी २०१८ या वर्षात पोलीस दलाची बदनामी झाली. त्यानंतर आता नवीन २०१९ या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पोलीस दलाची बदनामी सुरु झाली, ती लाचखोरीवरुन. दोनशे रुपयाची लाच दिली नाही म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसाने सुरतच्या ट्रक चालकाचे डोके फोडल्याचा प्रकार या आठवड्यात घडला. एरव्ही महामार्गावर असो की अन्य कुठे वाहतूक पोलिसांकडून लाच घेण्याचे प्रकरण नवीन नाही. सर्वत्र लाचखोरी बोकाळलीच आहे. ट्रक चालकाचे प्रकरण जरा हटके निघाले, म्हणून त्याची चर्चा अधिक होऊ लागली. या चालकाच्या दाव्यानुसार लाच दिली नाही म्हणूनच वाहतूक पोलिसाने दंडूका मारुन फेकला व त्यात डोळ्याजवळ दुखापत झाली. या घटनेचा व्हिडीओ तयार करायला सुरुवात करताच वाहतूक पोलिसांनी पळ काढला. चालकाने जखमी असवस्थेतील हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तो दोनच दिवसात संपूर्ण देशभरात पोहचल्या. जळगाव पोलिसांच्या लाचखोरीचे किस्से व त्यांना वाहत असलेली शिव्यांची लाखोली यामुळे जळगाव पोलीस दलाचे देशभर अब्रुचे धिंडवडे निघत आहेत. हा विषय पोलिसांपुरता मर्यादित नाही. पोलिसांच्या या कृत्याची ठेच जळगाकरांना पोहचली आहे. जळगावचे नाव बदनाम होत असल्याचे जास्त दु:ख आहे. याआधी सेक्स स्कॅँडलमध्ये जळगावचे नाव देशभर बदनाम झाले होते. जळगावचे वाईट अर्थाने नाव देशभरात पोहचते, तेव्हा आजही या सेक्स स्कॅँडलची आठवण येते. पोलिसांची लाचखोरी ही जळगावपुरताच मर्यादित नाही तर सर्वत्र आहे. मात्र जळगावचेच नाव वारंवार बदनाम होत आहे. आठ ते दहा वर्षापूर्वी दहा रुपयासाठी जळगाव पोलिसांची बदनामी झाली होती. परप्रांतीय ट्रक चालकाची इच्छा देवी चौकात एका वाहतूक पोलिसाने अडवणूक केली होती, तेव्हा त्या चालकाकडे फक्त दहा रुपयेच शिल्लक होते, ते देखील पोलिसाने घेतले होते. तेव्हा देखील दहा रुपयासाठी पोलीस दलाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले होते.