जळगावात पोलिसांनी १४ लाखाचा गुटखा पकडला, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:42 PM2020-07-13T22:42:46+5:302020-07-13T22:43:42+5:30
गुन्हा दाखल : सहायक पोलीस अधीक्षकांची कारवाई
जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या गुटख्याच्या गोदामावर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकाने सोमवारी रात्री ८ वाजता छापा टाकला. त्यात १३ लाख ६८ हजार १२० रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा मालक विजय मिश्रा याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
एमआयडीसीत एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना मिळाला होती. त्यानुसार डॉ.उगले यांनी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व पोलीस अधीक्षकांचे वाचक सिध्देश्वर आखेगावकर यांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या. या अधिकाºयांनाच कारवाईचे ठिकाण व स्वरुप माहिती होते, त्यामुळे सोबत असलेल्या पथकातील कोणालाच त्याची माहिती देण्यात आली नव्हती. पथकाला थेट गोदामावर नेण्यात आल्यावर कारवाई करण्यात आली. चौकशीत हे गोदाम व साठा विजय मिश्रा (रा.शाहू नगर) यांच्या मालकीचा असल्याची माहिती निरीक्षक बापू रोहोम यांनी दिली. या कारवाई पथकात सहायक फौजदार चंद्रकांत पाटील, रवींद्र घुगे, महेश महाजन, किरण चौधरी, दर्शन ढाकणे यांच्यासह सहायक पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील सहायक फौजदार विनयकुमार देसले, सुनील पाटील, अशोक फुसे, प्रवीण पाटील, जमील खान, रवींद्र पाटील, भूषण मांडोळे, आसिफ पिंजारी व भरत डोळे यांचा समावेश आहे.
गुटख्यातून कोट्यवधीची उलाढाल
सट्टा, दारु यासह गुटख्याची अवैध विक्री शहरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परराज्यातून कंटेनर भरुन गुटखा शहर व परिसरात आणला जात असून तेथून सकाळी ५ ते ७ या वेळेत लहान वाहनातून गुटखा किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहचविला जात आहे. या गुटख्याच्या साखळीत खाकीतील काही कर्मचाºयांचा सहभाग तर काहींचा आशिर्वाद असल्याचे उघड झाले होते.कोट्यवधीची उलाढाल करणाºया या माफियांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. दत्तात्रय शिंदे यांच्या काळातच माफियांचे गोदाम उदध्वस्त झाले होते. तेव्हा त्यांनी अवैध धंद्याशी संबंधित कर्मचाºयांना मुख्यालयात जमा केले होते. दरम्यान,आताही गोदामांची जागा वारंवार बदलविण्यात येत आहे. जळगाव शहर, पाळधी व नशिराबाद गुटख्याचे मुख्य केंद्र आहे.