कोविडमध्ये अनुकंपावर नोकरीत सामावून घेणारे जळगाव पोलीस राज्यात पहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 08:15 PM2021-03-10T20:15:51+5:302021-03-10T20:16:13+5:30
६८ जणांना दिले नियुक्तीपत्र : अवघ्या सहा दिवसात राबविली प्रक्रिया
जळगाव : कर्तव्यावर असताना कोरोनामुळे असो की इतर घटनांमध्ये जीव जीव गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर तात्काळ पोलीस सेवेत सामावून घेण्यात जळगाव पोलीस दल राज्यात पहिले ठरले आहे, अवघ्या सहा दिवसात ही प्रक्रिया पार पाडण्यात आली याचा आपल्याला गर्व असल्याची भावना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी व्यक्त केली. दिघावकर यांच्याहस्ते बुधवारी ६८ पोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोनामुळे सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. त्यांच्यातील तीन पाल्यांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. बाकीच्या पाल्यांचे वय अपूर्ण असल्याने त्यांनाही पुढच्या टप्प्यात सामावून घेतले जाणार आहे. त्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांच्या ६५ पाल्यांना सेवेत घेण्यात आले असून त्यात ५२ पुरुष व १६ महिलांचा समावेश आहे. अनुकंपावर असल्याने या उमेदवारांची फक्त शारीरीक चाचणी घेण्यात आली.
अनुकंपाचीही एकही जागा रिक्त नाही
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, २०१९ च्या भरतीच्या अनुषंगाने २२ टक्के जागा भरण्याची मुभा होती, त्याचा आकडा ३५ होता तर २०२० मध्ये रिक्त जागेनुसार ४१ जागांना मान्यता मिळाली. त्यात ३९ उमेदवार पात्र ठरले. अनुकंपावरील सर्व उमेदवारांना नोकरीत सामावून घेतल्यामुळे आता एकही जागा शिल्लक राहिलेली नाही. ज्या आहेत, त्यांची वयोमर्यादा पूर्ण झाली की त्यांनाही सामावून घेण्याचे आश्वासन मुंढे यांनी दिले. या कामासाठी सलग सहा दिवस मेहनत घेणारे उपअधीक्षक (गृह) डी.एम.पाटील, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे व त्यांच्या सहकार्यांचे दिघावकर व डॉ.मुंढे यांनी कौतूक केले.