जळगावात भाजपमधील अंतर्गत कलहाचा राजकीय बळी, आता झाले तीन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:34 PM2019-04-05T12:34:03+5:302019-04-05T12:34:48+5:30

पालकमंत्र्यांना काटशह

In the Jalgaon, the political divide of the BJP's internal divisiveness, now three groups | जळगावात भाजपमधील अंतर्गत कलहाचा राजकीय बळी, आता झाले तीन गट

जळगावात भाजपमधील अंतर्गत कलहाचा राजकीय बळी, आता झाले तीन गट

Next

चंद्रशेखर जोशी
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून आमदार स्मिता वाघ यांना मिळालेली उमेदवारी सरळमार्गे नव्हती. शह काटशहातून ती मिळाली खरी पण पालकमंत्र्यांच्या गटास यानिमित्त काटशह देण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे यशस्वी ठरले असल्याचेच लक्षात येत आहे. यानिमित्त आमदार हरिभाऊ जावळे यांच्याबाबतीत घडलेल्या ‘तिकीट कापणे’ प्रकाराचीच पुनरावृत्ती झाल्याचेही बोलले जात आहे.
भाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रारंभापासून स्पर्धा होती. या स्पर्धेत आमदार स्मिता वाघही होत्या. त्यांच्याबरोबर या स्पर्धेत उन्मेश पाटील यांचे केवळ नाव घेतले जात होते ते व्यक्तीश: फारसे इच्छूक नव्हते. इच्छूक होते ते बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, विद्यमान खासदार ए.टी. पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार.
संकट मोचकांची नाराजी
आमदार स्मिता वाघ व त्यांचे पती भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे विद्यार्थी परिषद चळवळीतील. त्यामुळे त्यांचे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी बऱ्यापैकी सख्य, यामुळे या तिघांची पसंती वाघ यांनाच होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळी ते उतरविले व स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली. यामुळे संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाराजी होती.
जिल्ह्यातूनही नाराजी
स्मिता वाघ यांचे पक्षांतर्गत संबंध हे सर्वांशी चांगले मात्र त्यांचे पती उदय वाघ यांच्यावर नाराज असलेला पक्षात एक मोठा वर्ग आहे. अगोदर ते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक म्हणून परिचित होते. त्यानंतर बदलत्या हवेबरोबर ते गिरीश महाजन यांच्याकडे वळले. हे करत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही असलेल्या संबंधांचा त्यांनी सोयीस्कर वापर करून घेतला, असे पक्षातील कार्यकर्ते सांगतात. त्यातच खासदार ए.टी. पाटील, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्याशीही त्यांचे वाजलेलेच. त्यामुळे कार्यकर्त्यांप्रमाणेच नेता वर्गही त्यांच्या विरोधात होता. यामुळेच पक्षातून उमेदवारी बदलाचा दबाव वाढत गेला. या दबावाचा फायदा घेत अतिशय नियोजनबध्द व्यूहरचना करून स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली गेली. उदय वाघ यांच्या विरोधातील नाराजी, खडसे, महाजन व आता पालकमंत्री गटाचे पक्षातील राजकारण हेच यानिमित्त समोर आले आहे.
तिकीट कापण्याची पुनरावृत्ती
२०१४ च्या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघातून आमदार हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र त्यावेळी रक्षा खडसे यांचे नावे पुढे केले गेले. यात उदय वाघ हे पुढे होते असे पक्षातील कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे हरिभाऊ जावळेंची उमेदवारी निश्चित झालेली रद्द केली गेली. त्याच घटनेची पुनरावृत्ती यावेळी झाली फरक एवढाच की त्यावेळी उमेदवारी दाखल नव्हती व एबी फॉर्मही दिला नव्हता. यावेळी त्या विरोधात झाले आहे.

Web Title: In the Jalgaon, the political divide of the BJP's internal divisiveness, now three groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव