Jalgaon: प्रताप तत्वज्ञान केंद्र आहे तेथेच राहणार !
By अमित महाबळ | Published: March 23, 2024 07:53 PM2024-03-23T19:53:04+5:302024-03-23T19:53:45+5:30
Jalgaon News: प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या केंद्राचे कामकाज विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या अंतर्गत चालणार आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे जी चर्चा समाजमनात चालली आहे, त्यामध्ये तथ्य नाही, असेही कुलगुरूंकडून स्पष्ट करण्यात आले.
- अमित महाबळ
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही ठरावांमुळे अमळनेरचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र हे विद्यापीठात हलविले जाणार असल्याची चर्चा समाजमनात आहे. त्याविषयी विद्यापीठाने खुलासा करावा, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी शनिवारी (दि.२३) आयोजित अधिसभेत केली असता, केंद्र स्थलांतराचा कोणताही विचार नसल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी स्पष्ट केले.
प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या केंद्राचे कामकाज विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या अंतर्गत चालणार आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेत ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे जी चर्चा समाजमनात चालली आहे, त्यामध्ये तथ्य नाही, असेही कुलगुरूंकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, केंद्राच्या कामकाजासंदर्भात सल्लागार समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या सभेत क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत समितीची पहिली बैठक झाली आहे, अशी माहिती देण्यात आली. अधिसभेतील नवीन नामनिर्देशित सदस्य प्राचार्य आय. डी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, प्रा. डॉ. धीरज वैष्णव यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
सीएचबीबाबत मार्गदर्शन घेणार...
तासिका तत्वावरील प्राध्यापकांची (सीएचबी) नियुक्ती केव्हा करणार, महाविद्यालयांनी या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करायची अथवा नाही, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर आचारसंहिता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करू, असे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले.
व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित राहू शकतील...
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अधिसभेचे सदस्य नसतात. त्यांनाही अधिसभेचे कामकाज पाहता यावे, सदस्यांची भूमिका कळावी या हेतूने अधिसभेत निमंत्रित करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो एकमताने मंजूर करण्यात आला. यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना अधिसभेत उपस्थित राहता येणार आहे.