Jalgaon: शीतपेयाच्या नावाखाली बनावट देशी दारूची निर्मिती, ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांना अटक
By विजय.सैतवाल | Published: May 4, 2024 04:24 PM2024-05-04T16:24:50+5:302024-05-04T16:25:17+5:30
Jalgaon News: शीतपेय निर्मितीच्या नावाखाली देशी दारु तयार करणाऱ्या जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरामधील कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून ४५ हजार दारुच्या सीलबंद बाटल्यांसह ७५ लाख ६४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - शीतपेय निर्मितीच्या नावाखाली देशी दारु तयार करणाऱ्या जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरामधील कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून ४५ हजार दारुच्या सीलबंद बाटल्यांसह ७५ लाख ६४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवार, ४ मे रोजी पहाटे करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी तपासणी, कारवाई केली जात आहे. त्यात जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात बनावट देशी दारु निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथक के - १० सेक्टरमध्ये पोहचले. त्या ठिकाणी मंदार आयुर्वेदीक प्रोडक्ट या नावाच्या कंपनीत जाऊन पाहणी केली असता तेथे शीतपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारुची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले.
मध्यरात्री अडीच वाजता पथक बनावट देशी दारुच्या कारखान्यावर पोहचले असता दरवाजा बंद करून आतमध्ये पाच जण बनावट मद्याची निर्मिती करून ती बाटलीत भरत असल्याचे आढळून आले. या पाचही जणांना पथकाने अटक केली.
तयार बॉक्ससह ‘देशी’ने भरलेले बॅरल
कंपनीच्या ठिकाणी देशी दारु रॉकेट संत्रा ब्रॅण्डचे ९० मि.ली. क्षमतेच्या ४५ हजार सीलबंद बाटल्या ठेवलेले ४५० बॉक्ससह देशी दारुने भरलेले बॅरलही आढळून आले. ४६ लाख २५ हजार रुपयांच्या दारुसह प्रत्येकी एक हजार लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक टाक्या, प्रत्येकी २०० लिटर क्षमतेच्या दोन स्पिरीटच्या रिकामाच्या टाक्यादेखील तेथे आढळून आल्या.
कंपनीमध्ये ९० मि.ली. क्षमतेच्या एक लाख रिकाम्या बाटल्या, ८० हजार पत्री बूच, बॅच क्रमांक असलेले दोन लाख लेबल, रॉकेट संत्र्याचे पुठ्ठे, पार्टीशन, लेबल पट्टीचे मशीन, सील करण्याचे मशीन, पाण्याच्या मोटार, नळी, आरओ मशीन, एमएच १९, सीवाय ३९३२ क्रमांकाचे मालवाहू वाहन, एक फ्रीज, कुलर, टेबल, स्टूल, फॅन, दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन, निरीक्षक डी.एम. चकोर, दुय्यम निरीक्षक एस.बी. चव्हाणके, एस.बी. भगत, सी.आर. शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, जवान गिरीश पाटील, सुरेश मोरे, पी.पी. तायडे, दिनेश पाटील, गोकूळ अहिरे, धनसिंग पावरा, एस.आर. माळी, विपूल राजपूत, आर.टी. सोनवणे, व्ही.डी. हटकर, एम.एम. मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांचे पथक सदर कारखान्याच्या ठिकाणी धडकले. कारवाई करत तीन ट्रक भरून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विभागीय निरीक्षक डी.एम. चकोर करीत आहेत.