वेतनवाढीच्या मागणीसाठी जळगावात प्राध्यापकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:51 PM2018-08-20T17:51:13+5:302018-08-20T17:54:04+5:30
वेतनवाढीसह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एन.मुक्टोच्या जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जळगाव : वेतनवाढीसह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एन.मुक्टोच्या जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खान्देशातील १५० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहसंचालक डॉ.केशव तुपे यांना देण्यात आले.
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा एन.मुक्टो शाखेतर्फे प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्त्व अध्यक्ष डॉ.संजय सोनवणे, सरचिटणीस प्रा.बी.पी.सावखेडकर, प्रा.सुधीर पाटील, डॉ.अनिल पाटील, डॉ.सी.पी.सावंत, प्रा.मनोहर पाटील यांनी केले. प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.राकेश शर्मा, डॉ.उमेश वाणी, डॉ.ई.जी.नेहेते यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात राज्यस्तरीय मागण्यांसोबत सहसंचालक कार्यालय स्तरावरील काही प्रमुख मागण्यांबाबतचे निवेदन सहसंचालक डॉ.केशव तुपे यांना देण्यात आले.