जळगावला डाळ उत्पादनात ७५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:39 AM2020-04-10T05:39:27+5:302020-04-10T05:39:55+5:30

निर्यात ठप्प : मजूर नसल्याने उत्पादनावर परिणाम; कच्च्या मालाचीही जाणवते टंचाई

Jalgaon pulses production decline by 75% | जळगावला डाळ उत्पादनात ७५ टक्के घट

जळगावला डाळ उत्पादनात ७५ टक्के घट

Next

विजयकुमार सैतवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग, कारखाने सुरू असले तरी यातील दालमिल उद्योगाच्या उत्पादनावर परिणाम होऊन डाळींचे उत्पादन ७५ टक्के घटले आहे. हमाल, मजुरांची संख्या कमी झाल्याने उत्पादनात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सोबतच डाळीची निर्यातदेखील १५ दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे डाळ उद्योगावर मोठा परिणाम झाला असून कच्चा मालही मिळणे अवघड होत आहे.
कोरोनाने जागतिक बाजारपेठेला चांगलेच वेढले आहे. भारतातून होणारी डाळींची निर्यातदेखील सध्या थांबली आहे. देशाच्या एकूण डाळींच्या उत्पादनात जळगावचा मोठा वाटा आहे. सध्यादेखील जळगावात ६० ते ६५ दालमिल असून, त्यामधून तयार झालेल्या डाळी येथून निर्यात होतात.
दालमिलचे उत्पादन २५ टक्क्यांवर
लॉकडाउनच्या काळात सर्व उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश असले तरी यातून कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग, व्यवसाय सुरू ठेवण्याला सूट आहे. असे असले तरी दालमिलवर लॉकडाउनचा मोठा परिणाम झाला आहे. दालमिल सुरू ठेवल्या तरी या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्याने तसेच माल चढ-उतार करण्यासाठी लागणारे हमाल बांधवदेखील नसल्याने दालमिलचे उत्पादन घटले आहे. साधारण १५० ते २०० टन डाळ दररोज तयार होते. सध्या मात्र डाळींच्या उत्पादनात ७५ टक्के घट झाली आहे.
जळगावातील दालमिलमध्ये जळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतून तसेच मराठवाडा व विदर्भातून कच्चा माल येत असतो. सध्या जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत, मात्र कृषी मालाची वाहतूक करण्यास सूट असली तरी वाहनधारक येण्यास तयार नाहीत. जेवढा कच्चा माल येतो तो उतरविण्यासाठीदेखील मजूर नसल्याने कच्च्या मालाची चणचण भासत आहे. जळगावातून दररोज अमेरिका, कॅनडा, युरोप, आॅस्ट्रेलिया यासह वेगवेगळ्या देशात निर्यात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विविध देशांमधील मालाच्या आयात-निर्यातीवर परिणाम होऊ लागला. काही दिवसांपासून तर डाळींची निर्यात पूर्णपणे थांबली आहे.

डाळींची निर्यात थांबली असली तरी सध्या जेवढे उत्पादन होते त्याची जळगावसह औरंगाबाद, नगर, पुणे जिल्ह्यातच वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे कच्च्या मालाची चणचण असली व डाळींचे उत्पादन घटले असले तरी डाळींचे भाव स्थिर आहेत.

दालमिलचे उत्पादन २५ टक्क्यांवर आले आहे. त्यात कच्च्या मालाची चणचण असून १५ दिवसांपासून डाळीची निर्यातदेखील थांबली आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष,
जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.

Web Title: Jalgaon pulses production decline by 75%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.